नरेंद्र मोदी २०१९ नंतरही देशाचे पंतप्रधान राहतील, असा विश्वास व्यक्त करणाऱ्या मुख्यमंत्री नितीश कुमारांना काँग्रेसने यांनी त्यांच्या जुन्या विधानाची आठवण करुन दिली आहे. ‘काही महिन्यांपूर्वी नितीश कुमार नरेंद्र मोदी देशाचे वाट्टोळे करणार असे म्हणाले होते,’ असे काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.

‘आता नितीश कुमार फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करतील. आधी ते नरेंद्र मोदी देशाला उद्ध्वस्त करणार अशी टीका करायचे. भाजपसोबत कधीही हातमिळवणी करणार नाही, असेही नितीश कुमारांनी म्हटले होते. नितीश कुमारांकडे कोणतीही नैतिकता नाही. त्यामुळे २०१९ मधील लोकसभा निवडणूक कोण जिंकेल, हे त्यांनी ठरवू नये. याबद्दलचा निर्णय देशच घेईल,’ अशा शब्दांमध्ये आनंद शर्मा यांनी नितीश कुमारांवर शाब्दिक हल्ला चढवला.

बिहारमध्ये महाआघाडीतून बाहेर पडत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेणाऱ्या नितीश कुमार यांचा काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनीदेखील समाचार घेतला आहे. ‘आता नितीश कुमार यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार ? मोदी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभूत होतील, असे नितीश कुमार आता म्हणतील का? आता ते मोदीजींच्या सोबतीने सत्ता राबवत आहेत. त्यामुळे आता ते कसे काय मोदींच्या विरोधात बोलणार?’, अशा शब्दांमध्ये राजीव शुक्ला यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला.

भाजपसोबत हातमिळवणी करत बिहारमध्ये सत्ता स्थापन केल्यावर आज (सोमवारी) नितीश कुमार यांनी पहिलीच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी पंतप्रधान मोदींची मुक्तकंठाने स्तुती केली. आगामी लोकसभा निवडणुकीनंतरही नरेंद्र मोदीच देशाच्या पंतप्रधानपदावर कायम राहतील, असा विश्वास बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला. पंतप्रधान मोदींविरोधात संघर्ष करण्याची क्षमता कोणामध्येच नसल्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटले. यावेळी नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्यासह तेजस्वी यादव यांच्यावर तोंडसुख घेतले.