देशात करोनाचा वाढता प्रादुर्भाव, चीन सोबत सुरू असलेला सीमा वाद, या मुद्यांवरून केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या काँग्रेसने आता पुन्हा एकदा वाढीत बरोजगारी व संकटात सापडलेल्या अर्थ व्यवस्थेवरून मोदी सरकारवर टीका करणे सुरू केल्याचे दिसत आहे. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी, बराच कालवधीपासून थांबलेल्या एसएससी व रेल्वे परीक्षांच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदींवर ट्विटद्वारे निशाणा साधल्याचे दिसत आहे. तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे असं त्यांनी पंतप्रधान मोदींना उद्देशून ट्विटद्वारे म्हटले आहे.

एसएससी आणि रेल्वेने अनेक परीक्षांचे निकाल वर्षांपासून थांबवून ठेवले आहेत. कशाचे निकाल अडकलेले आहेत, तर कशाची परीक्षा. कधीपर्यंत सरकार तरूणांच्या धैर्याची परीक्षा घेणार आहे, कधीपर्यंत? तरूणांचे म्हणने ऐका, तरूणांना भाषण नाही, नोकरी पाहिजे. असं ट्विट करत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

याशिवाय देशाच्या जीडीपीचे आकडे समोर आल्यापासून मोदी सरकार टीकेचे धनी ठरलं आहे. विविध क्षेत्रातील व्यक्तींबरोबरच विरोधी राजकीय पक्षांकडून मोदी सरकारला सवाल करत जबाबदार धरलं जात आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील आर्थिक संकटाविषयी सर्तक करणारा व्हिडीओ ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “जीडीपी २४ टक्क्यांनी कोसळला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी घसरण झाली आहे. प्रत्येक इशाऱ्याकडे सरकारकडून दुर्लक्ष केलं जाणं खूप दुर्दैवी आहे,” असं राहुल गांधी म्हणाले होते.

त्यांच्यापाठोपाठ काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला आहे. घसरलेल्या जीडीपीवरून काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे. “जीडीपी उणे २३.९ टक्के. मोदीजी, तुम्हाला आठवतंय का? ‘अच्छे दिन’, ‘सबका साथ सबका विकास’, ‘तुम्ही काँग्रेसला साठ वर्षे दिली, मला फक्त साठ महिने द्या’, आता पकोडे तळायची वेळ आली आहे. आणि तेही विकले जाणार नाहीत. फक्त भाषण, शून्य शासन,” असं म्हणत सिब्बल यांनी मोदींवर टीका केली आहे.