केरळची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी २१ वर्षीय विद्यार्थी असणाऱ्या आर्या राजेंद्रन हिची निवड करण्यात आली आहे. आर्याला आज सकाळी यासंदर्भात फोन आला तेव्हा तिला आपले मित्र मस्करी करत असल्याचं वाटलं. मात्र थेट भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्या जिल्हा सचिवालयामधून आर्याला अभिनंदन करणारा फोन करण्यात आल्यानंतर तिचा यावर विश्वास बसला. सीपीआय-एम पक्षाने आर्याची तिरुअनंतपुरमच्या महापौरपदी निवड केली आहे. विशेष म्हणजे आर्या सध्या बीएससी मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षाला असून तिचे अजून शिक्षणही पूर्ण झालेले नाही. वयाच्या २१ व्या वर्षी महापौर होत आर्याने देशातील सर्वात तरुण महापौर होण्याचा मान मिळवला आहे.

पाहा फोटो >> थक्क करणारा प्रवास… BSc च्या दुसऱ्या वर्षाला शिकणारी आर्या ते देशातील सर्वात तरुण महापौर

नुकत्याच केरळमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीचे निकाल समोर आले. तिरुअनंतपुरम महापालिका निवडणुकीमध्ये १०० पैकी ५१ जागांवर सत्ताधारी सीपीआय-एमने विजय मिळवला. भाजपाला या ठिकाणी ३५ जागांवर विजय मिळवला. सीपीआय-एमने आपल्या विजयानंतर पहिल्यांदाच निवडणूक लढवून निवडून आलेल्या आर्याला थेट महापौरपदी निवडलं आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्या जमीला श्रीधरन आणि अन्य दोन महिलाही महापौरपदाच्या शर्यतीमध्ये होत्या. मात्र तरुण चेहऱ्याला संधी देण्यासाठी पक्षाने आर्याची निवड केली आहे.

…म्हणून आर्याची वर्णी लागली

आर्याने महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुडावनमुगल येथून निवडून आली आहे. आर्याने यूडीएफच्या उमेदवार श्रीकला यांना दोन हजार ८७२ मतांनी हरवलं. आर्या ही २०२० च्या या निवडणुकीमधील सर्वात तरुण उमेदवारही ठरलीय हे विशेष. आर्याचं नाव महापौर पदासाठी सुचवण्याचा निर्णय सीपीएमच्या जिल्हा सचिवालयातील एका पॅनेलने घेतला. याच निर्णायावर आज शिक्कामोर्तब करण्यात आलं. राज्यातील स्थानिक स्वराज संस्थांमध्ये आधीपासूनच डाव्यांची सत्ता आहेत. त्यात नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्येही एलडीएफने विजय मिळवला आहे. एकीकडे आर्याने विजय मिळवला असला तरी तिच्या एलडीएफ पक्षाला दोन मोठे धक्केही बसलेत. एलडीएफचे महापौर पदाचे उमेदवार आणि सध्याचे महापौर पराभूत झाले. शहरातील पेरुरकडा वॉर्डचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जमीला श्रीधरन यांच्या गळ्यात महापौर पदाची माळ पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र तरुण चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने या ठिकाणी आर्याची वर्णी लागली.

नक्की पाहा >> वयाच्या २१ व्या वर्षीच झाली सरपंच, CCTV, सोलार प्रकल्पाने बदललं गावाचं रुप; मोदींनीही घेतली दखल

शिक्षण आणि राजकारण एकत्र करणार

आर्या ही केरळची राजधानी असणाऱ्या तिरुअनंतपुरममधील के. ऑल सेंट्स कॉलेजमध्ये शिकते. आर्या सध्या बीएससी मॅथमॅटिक्सच्या दुसऱ्या वर्षाला आहे. कॉलेजच्या वयापासूनच आर्या येथील स्थानिक राजकारणामध्ये खूप सक्रीय सहभाग घेत आहे.  मागील सहा वर्षांपासून ती पक्षासाठी काम करत आहे. सध्या आर्या स्टुडंट फेड्रेशन ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय समितीची सदस्य आहे. तसेच ती  बालसंगमच्या केरळमधील युनिटची अध्यक्ष आहे. बालसंगम हा सीपीएमच्या तरुणांचा गट आहे. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आर्याने आपण विजयी झाल्यास सर्वात आधी आपण जी विकासकाम हाती घेणार आहोत त्यामध्ये खालच्या स्तरातील प्राथमिक शाळांची परिस्थिती सुधारण्यासाठी काम करणार असल्याचं म्हटलं होतं. आपला शैक्षणिक प्रवास आणि राजकारण दोन्ही एकाच वेळी सुरु राहील असा विश्वास आर्याने व्यक्त केला आहे.

वडील इलेक्ट्रीशियन तर आई एलआयसी एजंट

आर्या ही सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील इलेक्ट्रीशियन आहे तर आई एलआयसी एजेंट म्हणून काम करते. आपल्या मुलीची थेट महापौरपदी निवड झाल्याने तिच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. पक्षाने आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी दिली असून मी ती योग्य प्रकारे पार पाडेल, असा विश्वास आर्याने व्यक्त केला आहे.