बंगळुरु पोलिसांनी 12 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजता एका दुचाकीस्वाराला हेल्मेट न घातल्याप्रकरणी थांबवलं होतं. हेल्मेट न घालणाऱ्यांविरोधात कारवाई करणाऱ्या पोलिसांनी दुचाकीस्वार तरुणाला कागदपत्रं तसंच वाहतूक परवाना आणि दंड भरण्यास सांगितलं. मात्र यावेळी तरुणाने जे सांगितलं ते ऐकून पोलिसांना धक्काच बसला. तरुणाने रक्ताने माखलेला चाकू बाहेर काढला आणि आपण मित्राचा खून करुन आलो असल्याची कबुली दिली.

‘मला माफ करा…मी नुकतंच माझ्या मित्राचा खून करुन आलो आहे आणि आत्मसमर्पण कऱण्यासाठी पोलीस ठाण्यात चाललो आहे’, अशी माहिती तरुणाने पोलिसांना दिली. तरुणाची कबुली ऐकल्यानंतर धक्का बसलेल्या पोलिसांनी त्याच्याकडून चाकू जप्त करत तरुणाला ताब्यात घेतलं आणि वरिष्ठांना माहिती दिली.

26 वर्षीय संदीप शेट्टी हा मुळचा उडुपीचा असून चिक्कलबुरा शहरात स्थायिक आहे. मित्र आणि व्यवसायिक भागीदार देवराज याच्यावर त्याने चाकूने वार केले असून सध्या तो रुग्णालयात दाखल आहे. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

‘संदीपने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी देवराजला 1 लाख रुपये दिले होते. देवराजने हे पैसे परत करण्यास नकार दिला होता’, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. संदीप आणि देवराज रिअल इस्टेट व्यवसायात भागीदार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ‘दोन वर्षांपूर्वी संदीपने देवराजला पैसे दिले होते. त्यावेळी त्याने हे पैसे रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्याने तसं केलं नसल्याची माहिती मिळाल्यानंतर संदीपने पैसे परत मागण्यास सुरुवात केली होती’.

सोमवारी संदीप पैसे मागण्यासाठी देवराजकडे गेला असता त्याने स्पष्ट नकार देत पैसे विसरुन जा असं उत्तर दिलं. यावर चिडलेल्या संदीपने चाकूने देवराजच्या पोटावर आणि पाठीवर वार केले. देवराज ओरडल्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक धावत आले. भीतीपोटी संदीपने बाइकवरुन पळ काढला आणि पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण करण्याचं ठरवलं.