टिक टॉक व्हिडिओसाठी रेल्वे रुळावर स्टंट करताना ट्रेनची धडक बसून पाकिस्तानात एका युवकाचा मृत्यू झाला. रेल्वे रुळाजवळून चालण्याचा व्हिडिओ बनवत असताना ही घटना घडली, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली.

रावळपिंडी शहराच्या जवळ असलेल्या शाह खालिद येथील रेल्वे रुळावर हा अपघात झाला. हमझा नावीद असे मृत मुलाचे नाव आहे. तो रेल्वे रुळाच्या बाजूने चालत होता. त्याचा मित्र व्हिडिओ शूट करत होता असे स्थानिक बचाव पथकाचे प्रवक्ते राजा झमन यांनी एएफपीला सांगितले.

“व्हिडिओसाठी पोझ देऊन ट्रॅक जवळून चालताना धावत्या ट्रेनची नावीदला धडक बसली” असे झमन यांनी सांगितले. बचाव पथकाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याआधीच हमझा नावीदचा मृत्यू झाला होता. टिक टॉकवर व्हिडिओ पोस्ट करण्यासाठी तो पोझ देत असताना ही घटना घडली, असे मृत तरुणाच्या मित्रांनी बचाव पथकातील कर्मचाऱ्यांना सांगितले. अन्य देशांप्रमाणे पाकिस्तानातही मोठया प्रमाणावर सेल्फी काढले जातात आणि सोशल मीडियासाठी व्हिडिओ बनवले जातात.