आता तुम्ही जेव्हा खरेदीला जाल तेव्हा क्रेडिट कार्डची गरज नाही किंवा ते सांभाळण्याची कटकट नाही. तुमचा चेहरा हेच तुमचे क्रेडिट कार्ड असेल. त्यासाठी प्रत्यक्ष क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची गरज नाही. एका फिनिश कंपनीने वस्तू खरेदीसाठी तुमच्या चेहऱ्याची वैशिष्टय़े क्रेडिट कार्डसारखी वापरण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. युनिकुल नावाच्या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केले असून, त्यात ग्राहकाचा चेहरा लक्षात ठेवला जातो व त्याची वैशिष्टय़े त्याच्या बँक खात्याशी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने निगडित केली जातात. यात कॅमेऱ्याचाही वापर केलेला आहे. दुकानात गेल्यानंतर तुम्ही या कॅमेऱ्याकडे बघितले, की तुमच्या चेहऱ्याची वैशिष्टय़े तिथे नोंदली जातात व नंतर त्याच्याशी निगडित असलेल्या खात्यातून पैसे घेतले जातात. युनिकुलने असा दावा केला आहे, की हे तंत्र लष्करात वापरल्या जाणाऱ्या अलगॉरिथम तंत्राइतके सुरक्षित आहे. या कंपनीचे रसलान पिसारेन्को यांनी सांगितले, की हे तंत्रज्ञान पुढील महिन्यापासून वापरात येत आहे.
यात जुळे भाऊ असतील व त्यांचा चेहरा अगदी सारखा असेल तर काय करणार, नेमके कुणाच्या खात्यातून पैसे घेणार, असा प्रश्न असला तरी त्याच्यावरही मात करण्यात आली आहे. या तंत्रात तुमचा चेहरा हाच तुमचा पिन नंबर आहे व त्यामुळे तुम्ही तीच व्यक्ती आहात हे ओळखले जाईल. जिथे शंभर टक्के अचूकतेची खात्री नसेल तिथे ग्राहकाला पिन नंबर विचारला जाईल, यात पैसे अदा करण्यासाठी कुठलेही कार्ड वापरले जाणार नाही. मोबाइल किंवा वॉलेटचा वापर होणार नाही.  
नेमकी पद्धत : ग्राहक त्याचा चेहरा दाखवेल, त्यामुळे त्याची ओळख पटेल, त्याच्या बँक खात्याची माहिती जुळवून बघितली जाईल. तुम्ही वस्तू खरेदी कराल, त्याचा तपशील पडद्यावर येईल. नंतर ओके टाइप केल्यानंतर व्यवहार पूर्ण होईल. या तंत्राचे पेटंट अजून प्रलंबित असून त्याच्या मदतीने खरेदीतील वेळ वाचू शकतो.