घाटातील रेल्वेमार्ग, आसपास हिरव्यागार रंगात नटलेली वनराई, मध्येच उंच कड्यावरून खाली झेपावणारा धबधबा, बर्फाच्छादित शिखरे.. हा निसर्गाचा रंगोत्सव घाटातून वळणेवळणे घेत चाललेल्या रेल्वेगाडीच्या खिडकीतून सहज बघता येतो. पण आकाशात मावळतीच्या वेळी चाललेली रंगांची उधळण, अंधाऱ्या रात्री आकाश उजळून टाकणारे तारे, लांब डोंगराच्या टोकावर उभे असलेले एकटे झाड अशा गोष्टी पाहणे कठीण असते. पण आता रेल्वे प्रवासात हा अनुभवही घेणे शक्य होणार आहे. रेल्वेने काचेचे छत असलेले तीन डबे घेण्याचा निर्णय घेतला असून सुरुवातीला या डब्यांचा वापर काश्मीर आणि तामिळनाडूतील अरकू घाटात केला जाणार आहे.

भारतातील निसर्गसौंदर्याचा प्रवाशांना आस्वाद घेता यावा यासाठी भारतीय रेल्वेने घेतला आहे. यासाठी आयआरसीटीसी, आरडीएसओ आणि पेरम्बूरमधील आयसीएफ यांच्यामार्फत काचेचे छत असलेले तीन डबे विकसित करण्यात येणार आहे. प्रत्येक डब्यासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून डिसेंबरपर्यंत हे डबे सेवेत येणार आहे. यातील एक डबा काश्मीर खो-यात जाणा-या रेल्वेला जोडण्यात येईल. तर उर्वरित दोन डबे तामिळनाडूतील अरकू घाटातून जाण्यात येणा-या गाडीला जोडले जातील अशी माहिती आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि प्रकल्प संचालक डॉ. ए के मनोचा यांनी दिली.

काचेचे छत असलेल्या गाड्या स्वित्झर्लंड, कॅनडा आणि युरोपमधील काही मोजक्या देशांमध्ये चालतात. काचेचे छत असलेल्या गाड्यांमध्ये निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेण्याची संधी असल्याने पर्यटकांकडूनही त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो. भारतात पहिल्यांदाच काचेचे छत असलेल्या डब्याचा प्रयोग केला जाणार आहे.  संपूर्णपणे वातानुकुलित असलेल्या या डब्याला काचेचे छत असेल. तसेच निसर्गसौंदर्य बघण्यासाठी खुर्च्यादेखील फिरत्या असतील. दोन खुर्च्यांमध्ये ऐसपैस जागा असून मनोरंजन, खानपान आदींची अत्याधुनिक आणि दर्जेदार सेवाही पुरवली जाणार आहे, असे डॉ. मनोचा यांनी सांगितले आहे.