“देशातील तरुणांची नागरिकत्व कायद्याबद्दल अफवा पसरवून दिशाभूल केली जात आहे, या कायद्याबाबत मुद्दाम तरुणांमध्ये संभ्रम निर्माण केला गेला. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे. हा कायदा नागरिकत्व हिसकावून घेणारा नाही, तर नागरिकत्व देणारा आहे, हा कायदा एका रात्रीत नव्हे, तर विचारपूर्वक तयार केला आहे”, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कोलकात्यात बोलताना दिली. तसेच सीएएबाबत बोलताना, “जे राष्ट्रपिता महात्मा गांधींनी सांगितलं त्याचंच पालन आम्ही करत आहोत” असंही मोदी म्हणाले.


पंतप्रधानांनी कोलकात्यातील बेलूर मठाला भेट देऊन स्वामी विवेकानंद यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर मोदींनी उपस्थित तरुणांना संबोधित केले. यावेळी मोदींनी नुकत्याच लागू करण्यात आलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. नारगिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत देशातील तरुणाईच्या मनात अनेक प्रश्न आहेत. काही जणांनी मुद्दाम तरुणांच्या मनात या कायद्याबाबत शंका निर्माण केल्या आहेत. मात्र मी देशभरातील तरुणांना सांगू इच्छितो की, देशाचे नागरिकत्व देण्यासाठी सरकारने रातोरात कुठलाही कायदा बनवलेला नाही. अनेक तरुण या अफवांचे बळी ठरले आहेत. त्या तरूणांना समजावून सांगणं हे आपलं कर्तव्य आहे,नागरिकत्व कायदा हा कुणाचेही नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा आहे. असं मोदी म्हणाले. तसंच, फाळणीमुळे पाकिस्तानमध्ये राहिलेल्या ज्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, धर्माच्या नावाखाली अत्याचार झाले, त्यांना भारतीय नागरिकत्व द्यायला पाहिजे असे राष्ट्रपिता असे महात्मा गांधी आणि अन्य ज्येष्ठ नेत्यांचे मत होते. ती पूर्तता या कायद्याद्वारे करण्यात आली आहे. जे गांधीजींनी सांगितलं त्याचं पालन आम्ही केलं ,’ असंही मोदींनी सांगितलं. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती ज्यांचा भारताच्या संविधानावर विश्वास आहे, ते प्रक्रियेनुसार भारतीय नागरिकत्व मिळवू शकते, असं मोदी पुढे म्हणाले.

“हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे, कुणाचेही नागरिकत्व काढून घेत नाही आहोत. आजही कोणत्याही धर्माची व्यक्ती मग तिचा देवावर विश्वास असो वा नसो तिचा भारताच्या घटनेवर विश्वास असेल, तर अशी व्यक्ती योग्य कायदेशीर प्रक्रियेद्वारे भारताचे नागरिकत्व मिळवू शकते,”असेही नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. यावेळी मोदींनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासह विरोधी पक्षांवरही निशाणा साधला.