राफेल कराराचा निषेध करत काँग्रेसने पंतप्रधान निवासस्थानासमोर निदर्शने केली. राफेल कराराचा मुद्दा पुढे करत भाजपा आणि काँग्रेस यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेतच. अशात युवक काँग्रेसने आज पंतप्रधान निवासस्थानासमोर निदर्शने करत राफेल करार म्हणजे एक घोटाळा आहे असा आरोप केला आहे.

राफेल करारात घोळ आहे, हा करार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नुकसान केले आहे असाही आरोप यावेळी करण्यात आला. एवढेच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात काँग्रेसने घोषणाबाजीही केली. राफेल करार कसा योग्य आहे हे सांगणारा एक व्हिडिओ भाजपाने ट्विट केला होता. ज्याला प्रत्युत्तर देणारा आणि त्यातला भ्रष्टाचार स्पष्ट करणारा व्हिडिओ काँग्रेसने ट्विट केला होता. इतकेच नाही तर राफेल करार कसा चुकीचा आहे हे काँग्रेसने देशभरात १०० पेक्षा जास्त पत्रकार परिषदांमध्ये सांगितले आहे.

आता काँग्रेसच्या कोअर कमिटीने अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे असेही समजते आहे. आज पंतप्रधान निवासस्थानासमोर मोदींविरोधात घोषणाबाजीही करण्यात आली.

राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारीही ट्विट करत टीका केली होती. त्यानंतर अमित शाह यांनीही ट्विट करतच राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले. गुरूवारी काँग्रेसने निदर्शने करत या करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.