राहुल गांधी यांनी राजीनामा मागे घ्यावा आणि काँग्रेस अध्यक्षपदी कायम राहावं अशी मागणी युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या निवासस्थानाबाहेर रस्त्यावर बसून घोषणाबाजी करत ही मागणी केली. यावेळी त्यांनी ‘हमारा नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो’ अशा घोषणा दिल्या. ‘राहुल गांधी जिंदाबाद! राहुल गांधी संघर्ष करा आम्ही तुमच्यासोबत आहोत!’ अशाही घोषणा यावेळी कार्यकर्त्यांकडून देण्यात आल्या.

दरम्यान राहुल गांधी यांनी आपल्याला काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहायचं नाही सांगत भूमिकेवर ठाम राहिले आहेत. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) खासदारांची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीला राहुल गांधीदेखील उपस्थित होते. या बैठकीदरम्यान, राहुल गांधी हे आपल्या काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर राहिले. आपण काँग्रेसच्या अध्यक्षपदी कायम राहणार नसल्याचे त्यांनी खासदारांना सांगितले. यूपीएच्या 51 खासदारांना राहुल गांधी यांची मनधारणी करण्यात अपयश आले आहे.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा एकदा मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला होता. हा पराभव केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची जबाबदारी नसून ती सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी केवळ स्वत: याची जबाबदारी न स्वीकारता अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती शशी थरूर आणि मनीष तिवारी यांनी केली. याव्यतिरिक्त अन्य खासदारांनीही त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्याची विनंती केली. परंतु राहुल गांधी यांनी राजीनाम्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला.

लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती. यापूर्वीही काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी आपण राजीनाम्यावर ठाम असल्याचे सांगितले होते. तसेच कार्यकारिणीच्या बैठकीतही त्यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांची मनधारणी करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच त्यांचा पर्याय उपलब्ध नसल्याचेही म्हटले होते.