उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ नुकतेच गोरखपूर येथील सर्वोदय किसान पदव्युत्तर महाविद्यालयात पोहोचले होते. तिथे त्यांना तरुणांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तरुण मुख्यमंत्र्यांसमोर नोकऱ्यांचा मुद्दा मांडताना दिसत आहेत. मात्र मुख्यमंत्री यावर कोणतेही उत्तर न देता सरळ निघून जातात. माजी आयएएस अधिकारी सूर्य प्रताप सिंह यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसतंय, की मुख्यमंत्री अधिकाऱ्यांसोबत पुढे जात आहेत. याच दरम्यान, आजूबाजूला उभे असलेले सर्व तरुण आरडाओरड करतात आणि त्यांना बघून नोकऱ्यांबद्दल प्रश्न विचारतात. महाराज जी, भरती प्रक्रिया अजून आली नाही का? ( आर्मी क भरतिया कहिया आई महाराज जी? ) असं विचारतात. मात्र, मुख्यमंत्री या तरुणांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघून जातात.

व्हिडीओ शेअर करताना माजी आयएएस सूर्यप्रताप सिंह लिहितात, “योगीजींची त्यांच्या मूळ जिल्ह्यात बघा स्थिती काय आहे? तुम्ही बेरोजगार तरुणांच्या प्रश्नाला सामोरे जाण्यास घाबरत आहात का? कदाचित तुम्हाला गोदी मीडियाच्या नेहमीच्याच प्रश्नांना उत्तर देण्याची सवय झाली असेल. गोडीला प्रसारमाध्यमांकडून प्रश्नांची उत्तरे देण्याची सवय झाली असेल. आता या विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होईल का? हा देशद्रोह ठरेल का? की त्यांना गुंड घोषित करून त्यांचे घर पाडले जाईल? डर के आगे जीत है, हे या तरुणांना समजले आहे. युवा शक्ती जिंदाबाद.”

आणखी वाचा- योगी आदित्यनाथ यांच्यावर टिप्पणी; उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल अझीज कुरेशींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर युजर्सनी देखील यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एक युजर म्हणतो की ‘यूपीमध्ये भाजपाला ५० जागाही जिंकता येणार नाही. १०० जागा तर लांबची गोष्ट आहे. तर, दुसरा एक युजर लिहितो, अमर दुबेंच्या पत्नीला तुरुंगात टाकून यांच्याकडून ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आणखी एक युजर म्हणतो, ‘गरीब लोक असहाय्य आणि बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे निषेध करायलाच पाहिजे. निषेध करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे.’