जम्मू काश्मीरमध्ये सर्वपक्षीय खासदारांच्या भेटीनंतर हिंसाचार शमलेला नाही. अनंतनागमध्ये हिंसाचारादरम्यान सुरक्षा दलाने पॅलेट गन्सने मारा केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काश्मीरमध्ये हिंसाचारात मृत्यू झालेल्यांचा आकडा ७५ वर पोहोचला आहे.
हिंसाचारादरम्यान जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पॅलेट गनऐवजी पावा शेल्सचा वापर करण्यास केंद्रीय गृहमंत्र्यांनी नुकतीच मंजुरी दिली होती. हा निर्णय घेऊन तीन दिवस उलटले असताना अनंतनागमध्ये सुरक्षा यंत्रणांना पॅलेट गन्सचा वापर करावा लागला. अनंतनाग जिल्ह्यातील सीर हमदान गावात पोलिस आणि निमलष्करी दलाचे संयुक्त पथक संशयितांना अटक करण्यासाठी आले होते. यादरम्यान काही तरुणांनी या पथकाच्या कारवाईला विरोध केला. यानंतर सुरक्षा दलाचे एक पथक दुस-या दिवशी पुन्हा सकाळी गावात आले. या पथकाने घरात छापा टाकून त्यांना मारहाण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.  या कारवाईविरोधात ग्रामस्थ पुन्हा रस्त्यावर उतरले. जमावाला पांगवण्यासाठी पथकांनी जमावावर पॅलेट गन्सने मारा केला. या मा-यात नासीर अहमद भट या २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नासीरच्या छातीजवळ पॅलेट गनमधील गोळी लागली होती. रुग्णालयात दाखल करत असताना नासीरचा मृत्यू झाला. पॅलेट गन वापराच्या या ताज्या घटनेत सुमारे ५० जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये एका महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर श्रीनगरमध्ये उपचार सुरु आहेत. आणखी एका तरुणाच्या मृत्यूमुळे दक्षिण काश्मीरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटण्याची चिन्हे आहेत.
काश्मीरमध्ये हिंसाचारादरम्यान पॅलेट गन्सचा वापर करण्यास विरोध होत आहे. पॅलेट गन्समधून एकाच वेळी असंख्य छर्रे बाहेर पडतात. जवळून पॅलेट गन्सने मारा केल्यास यात या गन्स जीवघेण्या ठरतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी पॅलेटऐवजी पाव्हा शेल्सचा वापर करण्यास परवानगी दिली होती. दरम्यान, काश्मीरमध्ये हिंसाचार सुरु असतानाच आज केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काश्मीरमधील परिस्थितीविषयी माहिती देणार आहेत. सर्वपक्षीय खासदारांनी ४ आणि ५ सप्टेंबररोजी काश्मीर दौरा केला होता. या दौ-याविषयीची माहिती ते पंतप्रधानांना देतील.