समलैंगिक संबंधांना गुन्ह्याच्या कक्षेतून वगळायचे कि, नाही याचा निर्णय केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयावर सोपवला आहे. असे असताना आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यात समलैंगिक संबंधांना नकार दिला म्हणून एका २७ वर्षीय युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्रह्मा रेड्डी (२७) असे मृत युवकाचे नाव असून तो प्रकाशम जिल्ह्यातील दारसी मंडलमधील लानकोजूपाल्ली गावात रहायचा.

साई किरण हा हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. शिक्षक भरती परिक्षेची तयारी करणाऱ्या ब्रह्मा रेड्डीची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवरुन साई किरणबरोबर ओळख झाली. त्यानंतर साई किरणने ब्रह्मा रेड्डीला त्याच्या बर्थ डे पार्टीला येण्याचे निमंत्रण दिले. ब्रह्मा जेव्हा तिथे गेला तेव्हा साई आणि त्याचे अन्य चार मित्र बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी जवळच्या फार्महाऊसवर गेले.

तिथे सर्वजण दारु प्यायले. त्यानंतर साई आणि त्याचे मित्र ब्रह्मावर समलैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करु लागले. पण ब्रह्माने त्यांची मागणी मान्य करण्यास नकार दिला. आपण बाहेर जाऊन तुम्ही समलिंगी आहात हे सर्वांना सांगू अशी धमकी त्याने दिली. त्यावर चिडलेल्या पाचही जणांनी ब्रह्माची हत्या करुन त्याचा मृतदेह फेकून दिला. स्थानिकांना ब्रह्माचा मृतदेह सापडल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. ब्रह्मा रेड्डीच्या फोन रेकॉर्डवरुन तपास केल्यानंतर पोलिसांनी चौघांना आणि एका आरोपीच्या वडिलांना अटक केली. ते आरोपींना पळून जाण्यासाठी मदत करत होते.