कोचीतील एका कॉफी शॉपमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील प्रकार घडत असल्याच्या आरोपांवरून भाजपच्या युवामोर्चा कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त करत संबंधित कॉफी शॉपवर हल्लाबोल केला होता. परंतु, या घटनेविरोधातच आता प्रेमी युगुलांमध्ये रोष व्यक्त होण्यास सुरूवात झाली आहे. प्रत्येकाला प्रेम करण्याचे स्वातंत्र्य असते असा पवित्रा घेत प्रेमी युगुलांच्या एका गटाने २ नोव्हेंबर हा दिवस ‘चुंबन दिवस’ (kiss day) म्हणून साजरा करुन युवामोर्चाच्या कृतीचा निषेध करण्याचे ठरविले आहे.
गेल्या आठवड्यात एका वृत्तवाहिनीने कोचीतील ‘डाऊनटाऊन’ नावाच्या कॉफी शॉपमध्ये प्रेमी युगुलांचे अश्लील प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आणले होते. त्यानंतर काही तासांतच भाजपच्या युवामोर्चा कार्यकर्त्यांनी या कॉफी शॉपवर हल्लाबोल करत मोर्चा काढला. या घटनेविरोधात आता सोशल मिडियावर तरुण-तरुणी एकत्र येत असून प्रेम करण्याचे स्वातंत्र्य असल्याच्या मुद्द्यावरून २ नोव्हेंबरला ‘चुंबन दिवस’ साजरा करण्याचे आवाहन प्रेमी युगुलांना करण्यात येत आहे.
एका युवा गटाने फेसबुकवर ‘किस ऑफ लव्ह’ नावाचे पेज तयार करण्यात केले असून आतापर्यंत जवळपास २६०० जणांनी कोचीत झालेल्या घटनेविरोधात येत्या २ नोव्हेंबर रोजी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे ‘चुंबन दिवस’ साजरा करण्याची तयारी दर्शविली आहे. इतकेच नव्हे तर, या ‘चुंबन दिवस’ कार्यक्रमाचे प्रसारण करण्यासाठी माध्यमांनाही उपस्थित राहण्याची विनंती प्रेमी युगुलांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाला आम्ही परवानगी देणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.