कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी सरकारवर दबाव वाढवण्यासाठी काल दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला होता. पण या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसाचाराचं वळण लागलं. आंदोलकांनी लाल किल्ल्यामध्ये घुसून हिंसाचार केला. या वेळी एका आंदोलकाने लाल किल्ल्यावरील खांबावर चढून शीख धर्माशी संबंधित ‘निशान साहिब’ हा झेंडा फडकवला.

लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ फडकवणारा हा युवक पंजाबच्या तरण तारण जिल्ह्यातील तारा सिंग गावचा रहिवाशी आहे. लाल किल्ल्यावर झालेल्या या प्रकाराचा अनेक राजकीय नेत्यांनी निषेध केला आहे. लाल किल्ल्यावर ‘निशान साहिब’ फडकवणाऱ्या युवकाच्या नातेवाईकाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन : हिंसाचारानंतर पंजाब-हरयाणात अलर्ट! मोबाईल सेवा बंद

शेतकऱ्यांपासून जीव वाचवण्यासाठी पोलिसांनी लाल किल्ल्यावरुन मारल्या उड्या; धक्कादायक व्हिडीओ समोर

या मध्ये हे नातेवाईक झेंडा फडकवल्याबद्दल युवकाचे कौतुक करताना दिसतात. या युवकाचे वडिल आणि आजोबा यांच्यामते, त्या युवकाने शौर्य दाखवलं. ‘निशान साहिब’ भगव्या रंगाचा ध्वज असून प्रत्येक गुरुद्वारावर हा झेंडा फडकवला जातो. ट्रॅक्टर मोर्चासाठी जो मार्ग आखून दिला होता, त्या मार्गावरुन न जाता शेतकरी आंदोलक दुसऱ्या मार्गाने दिल्लीत घुसले. आयटीओ येथे दिल्ली पोलिसांबरोबर संघर्ष करुन हे आंदोलक लाल किल्ल्यामध्ये घुसले. शेकडो आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली व बसेसची तोडफोड केली. त्यामुळे पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांडया फोडून लाठीचार्ज करावा लागला.