पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (३० ऑगस्ट) मन की बात कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान मोदी हे आकाशवाणीवरून हा संवाद साधतात. हा कार्यक्रम यू ट्यूबरही प्रसारित केला जातो. यावेळी मन की बातच्या यू ट्यूबवरील व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक करण्यात आल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा व्हिडीओ मोदी यांच्या नावे असलेल्या यू ट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला आहे. या व्हिडीओला लाईकपेक्षा जास्त डिसलाईक करण्यात आल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर त्याची पडताळणी केली. त्यावेळी हे सत्य असल्याचंच दिसून आलं.

 

हा व्हिडीओ अप केल्यानंतर २१ तासांमध्ये २४ हजार जणांनी लाईक केला आहे. मात्र, डिसलाईक करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याचं दिसून आलं. तब्बल ५२ हजार जणांनी व्हिडीओवर नाराजी व्यक्त करत डिसलाईक केलं आहे.

डिसलाईक करण्यामागे हे आहे कारण?

देशात सध्या करोनामुळे परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले आहेत. जेईई व नीट परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहेत. देशातील करोना स्थितीचा विचार करता, या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होताना दिसत आहे. मन की बात कार्यक्रमात मोदी यांनी या परीक्षेसंदर्भात कोणतंही भाष्य न केल्यानं नाराजी व्यक्त झाल्याचं दिसत आहे. नागरिकांनी कमेंट करून तशी नाराजी व्यक्त केली आहे.

मोदी कोणत्या विषयावर बोलले?

‘मन की बात’मध्ये मोदी म्हणाले की, “जगातील खेळण्यांच्या ७ लाख कोटींच्या बाजारपेठेत भारताचा वाटा खूप कमी आहे. तो वाढवण्याची गरज आहे. नवउद्यमींनी एकत्र येऊन खेळणी तयार करावीत. स्थानिक खेळण्यांसाठी आग्रह धरण्याची हीच वेळ आहे. तरुण उद्योजकांनी मुलांसाठी भारतात संगणकाधारित खेळही तयार करावेत. ते खेळ भारतीय संकल्पनांवर आधारित असावेत,” असं मोदींनी सांगितलं.