22 November 2019

News Flash

शिवसेनेला धक्का, लोकसभेचे उपाध्यक्षपद YSR काँग्रेसला?

एनडीएचा सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भाजपाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे.

लोकसभेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजपाने वायएसआर काँग्रेस या पक्षाला ऑफर दिल्याचे वृत्त आहे. एनडीएतील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेने या पदासाठी दावा केला होता. मात्र, शिवसेनेला डावलून वायएसआर काँग्रेसला ही ऑफर देण्यात आल्याने भाजपाची ही खेळी आश्चर्यकारक मानली जात आहे. भाजपा खासदार आणि प्रवक्ते नरसिम्हा राव यांनी मंगळवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख जगनमोहन रेड्डी यांची विजयवाडा येथे भेट घेतली आणि हा प्रस्ताव ठेवला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.

आंध्र प्रदेशातील लोकसभेच्या २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसने जिंकल्या आहेत. भाजपाच्या या ऑफरला अद्याप जगनमोहन यांच्या पक्षाने कुठलेही उत्तर दिलेले नाही. सुत्रांच्या माहितीनुसार, जगनमोहन यांनी राजकीय समीकरणांवर विचारविनिमय करण्याचे कारण देत थोडा वेळ मागितला आहे. आंध्र प्रदेशातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाचे मतदार वायएसआर काँग्रेसच्या विजयाचा आधार आहेत. त्यामुळे भाजपाच्या या ऑफरला स्विकारण्यापूर्वी जगनमोहन यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करायची आहे. त्यानंतर ते भाजपाचा प्रस्ताव स्विकारायचा की नाकारायचा यावर निर्णय घेणार आहेत.

आंध्र प्रदेशातील स्थानिक बातम्यांनुसार, जगनमोहन रेड्डी आणि नरसिम्हा राव यांच्यामध्ये अर्धातास चर्चा झाली. ही भेट एक औपचारिक भेट सांगण्यात आले मात्र, पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सांगण्यावरुनच नरसिम्हा राव हा प्रस्ताव घेऊन जगनमोहन यांच्याकडे गेले होते, असे सांगण्यात येत आहे.

गेल्या सरकारच्या काळात सन २०१४ मध्ये भाजपाने एनडीएचा भाग नसलेल्या अद्रमुकला लोकसभा उपाध्यक्षपदाची ऑफर दिली होती. त्यानुसार, अद्रमुकच्या थंबीदुराई यांना उपसभापती बनवण्यात आले होते. त्यानंतर अद्रमुक एनडीएत सहभागी झाली होती. त्यावेळी अद्रमुक सर्वाधिक लोकसभा जागा जिंकणारा तीसरा पक्ष होता. त्यानंतर आताही भाजपाकडून याच फॉर्म्युल्याचा वापर करुन वायएसआर काँग्रेसला उपाध्यक्षपद देऊन एनडीएत समाविष्ट करुन घेण्याचा मानस असावा.

लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये भाजपाने सर्वाधिक ३०३ जागा जिंकल्या आहेत. त्यानंतर ५२ जागा जिंकून काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर २३ जागा जिंकून काँग्रेसचा सहकारी पक्ष डीएमके आहे. तर २२ जागा जिंकणारा वायएसआर काँग्रेस हा चौथा पक्ष आहे. त्याचबरोबर २२ जागांसह तृणमुल काँग्रेसही चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर १८ जागा जिंकणारी शिवसेना पाचव्या स्थानावर आहे. १६ जागा जिंकून जदयू सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, जर जगनमोहन रेड्डी यांनी हा प्रस्ताव नाकारला तर लोकसभेचे उपाध्यक्षपद हे शिवसेना किंवा जदयूकडे जाऊ शकते.

First Published on June 12, 2019 11:22 am

Web Title: ysr congress offer for deputy speaker post of loksabha from bjp before that shiv sena had claimed on that aau 85
Just Now!
X