पाकिस्तानमध्ये करोना व्हायरस महामारीचा विळखा दिवसागणिक आधिक घट्ट होत चालला आहे. सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता नेत्यांनाही करोना व्हायरसनं ग्रासलं आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांना करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. याआधी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान शाहिद खाकान अब्बासीही करोनाबाधित झालेत.

शनिवारी माजी पंतप्रधान यूसुफ रजा गिलानी यांना करोनाची लागण झाल्याचा अहवाल आला. त्यांचा मुलगा कासिम गिलानी यांनी ट्विट करत ही माहिती आहे. ६७ वर्षीय गिलानी भ्रष्ट्राचाराच्या प्रकरणात एनएबीच्या सुनावणीमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांना करोनाचा संसर्ग झाला. गिलानीयांच्याआधी मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन)चे प्रमुख शहबाज शरीफ यांनाही एनएबीकडे उपस्थित राहिल्यानंतर करोनाचा संसर्ग झाला होता.

करोना व्हायरसच्या विळख्यात येणारे यूसुफ रजा गिलानी पाकिस्तानमधील पहिलेच नेते नाहीत. याआधी माजी पंतप्रधान शहिद अब्बासी, रेल्वेमंत्री शेख रशीद अहमद, केंद्रीय राज्यमंत्री शहरआर आफ्रिदी, आमिर डोगर , खासदार नावेद अली आणि शरजील मेमन यासारख्या नेत्यांनाही करोना व्हायरसचा संसर्ग झाला आहे. यानंतर या नेत्यांनी स्वत:ला आयसोलेशन केलं आहे.

पाकिस्तानमध्ये दिवसागणिक करोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. मागील २४ तासांत पाकिस्तानात सहा हजार ४७२ नवे रुग्ण आढळून आले होते. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या एक लाख ३२ हजार ४०५ झाली आहे. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ५० हजार जणांनी करोनावर मात केली आहेत. तर आतापर्यंत २५५१ जणांचा मृत्यू झाला आहे.