युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे युवांमध्ये जोर लावून काम करत आहेत. शिवसेनेचे एक नेते असल्याच्या दृष्टीकोनातून त्यांनी आपले काम सुरू केले आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्याकडे राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे सूचक वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. शिवसेना खासदारांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठीही आदित्य ठाकरे यांनी दौरा केला होता. तसेच त्या ठिकाणचे प्रश्न समजून घेतले होते. त्यांच्यामध्ये राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्याचे राऊत म्हणाले. यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली होती. युवासेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई यांनी इन्स्टाग्रामवर यासंदर्भात पोस्ट टाकून आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आदित्य ठाकरे निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त होती. त्यानंतर राऊत यांनी ‘उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरेंसाठी लहान पद आहे. तरुणांचे नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली असून प्रतिष्ठा मिळवली आहे. आदित्य ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी तरुणांमध्ये एक जबरदस्त आकर्षण आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्त्व करतील अशा घडामोडी, जडणघडण सध्या सुरु आहे’, असे वक्तव्य केले होते.

तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनीदेखील आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरावे, असे म्हटले होते. तसेच आदित्य ठाकरेंमध्ये मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून ते मुख्यमंत्री झाले तर आपल्याला आवडेल असे मतही त्यांनी व्यक्त केले होते.