सुपरमॅन, जिजस ख्रिस्ट सुपरस्टार यांसारख्या दमदार चित्रपटांच्या वेशभूषाकार इवॉन ब्लेक Yvonne Blake यांचे निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या. ब्रिटनमध्ये जन्मलेल्या स्पॅनिश वंशाच्या इवॉन यांनी माद्रिद येथे अखेरचा श्वास घेतला.

रिचर्ड डोनर दिग्दर्शित ‘सुपरमॅन’ या चित्रपटामुळे त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचल्या होत्या. कारण जगप्रसिद्ध ‘सुपरमॅन’चा पोशाख इवॉन यांनीच डिझाइन केला होता. अत्यंत अनोख्या डिझाइनच्या सुपरमॅनच्या पोशाखाने त्या काळात अक्षरश: धुमाकूळ घातला होता. हा पोशाख आजही तितकाच प्रसिद्ध आहे.  या चित्रपटानंतर त्यांनी सुपरहिरोच्या पोशाखांवर आधारित एक कॉमिक बूकसुद्धा प्रकाशित केले होते. १९८० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुपरमॅन २’ या चित्रपटातील कलाकारांसाठीही त्यांनी कपडे डिझाइन केले होते.

१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या फ्रँकलिन शॅफनरच्या निकोलस अँड अॅलेक्झांड्रा या चित्रपटातील कलाकारांच्या वेशभूषेसाठी इवॉन यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. इवॉन यांनी त्यांच्या करिअरमध्ये चार प्रतिष्ठित गोया पुरस्कार पटकावले. त्याचप्रमाणे बाफ्ता आणि एमी पुरस्कारांसाठीही त्यांना नामांकन मिळालं होतं. जुलै २०१६मध्ये त्यांची स्पॅनिश फिल्म अकादमीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.