केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा पुरविण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. यापूर्वी या दोघांनाही झेड दर्जाची सुरक्षा पुरविण्यात येत होती. मात्र, गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार या दोघांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेने गडकरी यांची सुरक्षा वाढविण्याची मागणी केली होती. त्यावेळी केंद्र सरकारने त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याची मागणी फेटाळली होती. मात्र, चारच महिन्यात या निर्णयाचा फेरविचार करण्यात आला असून, गडकरी यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात कॅबिनेट स्तरावर गृहमंत्री राजनाथसिंह यांच्यानंतर फक्त गडकरी यांनाच झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. अर्थमंत्री अरूण जेटली आणि कृषिमंत्री राधामोहन सिंह यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. उर्वरित सर्व कॅबिनेट मंत्र्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
राज्यमंत्री स्तरावर जितेंद्र सिंग आणि गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. झेड प्लस सुरक्षेमुळे गडकरी यांच्या आजूबाजूला केंद्रीय राखीव पोलीस दलातील ४० कमांडो दिवसरात्र तैनात असतील.