जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे रविवारी सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, इथे लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्याासाठी सुरक्षा रक्षकांकडून शोध मोहीम अद्याप सुरु आहे. काश्मीर झोन पोलिसांनी याबाबत माहिती दिली.

पोलिसांच्या माहितीनुसार, श्रीनगर येथील झदिबल आणि झूनिमर पोझवालपोरा या भागात दहशतवादी लपून बसल्याची खबर सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. त्यानुसार, सुरक्षा रक्षकांनी येथे शोध मोहिम सुरु केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर गोळीबार केला. त्याला आपल्या जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत.

दहशतवादी लपून बसल्याचे उघड झाल्याने श्रीनगर शहरातील इंटरनेट सेवा तात्पुरती खंडीत करण्यात आली आहे. चकमकीपूर्वी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेल्या तीन दहशतवाद्यांच्या पालकांना घटनास्थळी आणण्यात आले होते. या पालकांनी आपल्या मुलांना शरण येण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यांनी याला नकार दिला होता.

याबाबत माहिती देताना पोलीस महासंचालक विजयकुमार म्हणाले, “आमच्या सुत्रांच्या माहितीवरुन दहशतवाद्यांची ओळख पटवण्यात आम्ही यशस्वी ठरलो. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलावण्यात आले. या पालकांनी आपल्या मुलांना शरण येण्याचे आवाहनही केले. मात्र, त्यांनी यासाठी नकार दिला. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी दोघे जण २०१९ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रीय होते. गेल्या महिन्यांत दोन बीएसएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यात यांतील एक जण सामिल होता.” एएनआयने याबाबत वृत्त दिलं आहे.

श्रीनगरमध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा ही चकमक घडली आहे. मे महिन्यांत इथल्या नवा कडल भागात तब्बल बारा तास चाललेल्या चकमकीत हिज्बुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केले होते. यामधील एक जण काश्मीरी फुटिरतावादी नेत्याचा मुलगा होता. या चकमकीत परिसरातील डझनभर घरांचे नुकसान झाले होते. कारण यावेळी दहशतवाद्यांनी बॉम्ब स्फोट घडवून आणले होते. त्यामुळे लागलेल्या आगीत घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान आणि एक जम्मू-काश्मीर पोलीस दलातील कॉन्स्टेबल जखमी झाले होते.