अल- कायदाशी संबंधित असलेल्या अन्सार गझवट उल हिंद या संघटनेचा प्रमुख झाकीर मुसा या दहशतवाद्याचा सुरक्षा दलांनी खात्मा केला असून झाकीर मुसाच्या अंत्ययात्रेला हजारोंची गर्दी झाली होती. गर्दीतील काही तरुणांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या असून काही ठिकाणी दगडफेकीचे प्रकारही घडले.

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथे  दादसारा येथे गुरुवारी एक दहशतवादी मारला गेला होता. तो मारला गेलेला दहशतवादी म्हणजे झाकीर मुसा असल्याचे शुक्रवारी त्याचा मृतदेह सापडला असता निष्पन्न झाले. चकमकीच्या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.  दहशतवाद्यांनी शरण यावे यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण लपलेल्या दहशतवाद्यांनी हातबॉम्ब फेकण्यास सुरुवात केली. मुसाचा झाल्याचे समजताच शुक्रवारी शोपियाँ, पुलवामा, अवांतीपोरा, श्रीनगर या भागात मोठ्या प्रमाणात निषेध मोर्चे काढण्यात आले. लोकांनी मुसा याच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या.

शुक्रवारी सकाळी मुसाचा मृतदेह त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आला. मुसाच्या मृत्यूनंतर शुक्रवारी पुलवामा येथे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. पुलवामा आणि जुने श्रीनगर येथे काही तरुण रस्त्यावर उतरले होते. त्यांनी मुसाच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. तसेच बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या सुरक्षा दलांवर दगडफेकही केली. या भागांमध्ये शुक्रवारपासून सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

या भागात दगडफेकीच्या किरकोळ ११ घटना घडल्याची माहिती सीआरपीएफच्या प्रवक्त्यांनी दिली. परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुसा हा मूळचा नुरपुरा या गावचा होता. शुक्रवारी सकाळी त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. मुसाच्या अंत्ययात्रेला हजारो लोकांनी गर्दी केली होती. या गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.