वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईक याने हिदू आणि चिनी नागरिकांविषयी वांशिक वक्तव्य केली होती. अशा विधानांमुळे मलेशियातील सामाजिक सौहार्दता दूषित होत असल्याने नाईकवर मलेशियात भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

झाकीर नाईक याने मलेशियातील हिंदू आणि चिनी समुदायाविषयी वांशिक वक्तव्य केली होती. नाईकच्या वक्तव्यावर मलेशियाच्या पंतप्रधानांनीही नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणात झाकीर नाईकविरोधात दोन वेळा समन्स बजावण्यात आले होते. बुकित अमन या द रॉयल मलेशिया पोलीस मुख्यालयात दुसऱ्यांदा चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. झाकीर हा मुस्लिमबहुल मलेशियाचा कायमस्वरूपी नागरिक आहे. कोटा बारू येथे ३ ऑगस्ट रोजी झालेल्या चर्चासत्रामध्ये झाकीर नाईक याने मलेशियातील हिंदू आणि मलेशियातील चीनचे नागरिक यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याची तक्रार आहे. झाकीर नाईककडून केल्या जाणाऱ्या वक्तव्याची गंभीर दखल घेण्यात आली असून, त्याच्यावर भाषणाची बंदी घालण्यात आली आहे.

रॉयल मलेशिया पोलीस कार्यालयाचे वरिष्ठ सहायक आयुक्त दतुक अस्मावती अहमद यांनी या वृत्ताला दूजोरा दिला आहे. सर्व पोलीस ठाण्याना देण्यात आलेले परिपत्रक खरे आहे. सर्व पोलीस ठाण्यांना तसे आदेश देण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि वांशिक सौहार्दता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे ते म्हणाले. मेलका, जोहोर, सेलंगोर, पेनांग, केदाह, पर्लिस आणि सारवाक या सात राज्यांमध्ये नाईकला भाषण करण्यास बंदी घालण्यात आली आहे. झाकीर नाईकच्या वक्तव्यांवर मलेशियाच्या मंत्रिमंडळातही चर्चा झाली आहे. मलेशियन नागरिकांची संवेदनशीलता समजून न घेता काही घटक खोट्या बातम्या पसरवून वांशिक विधाने करीत आहेत, अशी टीका मलेशियाचे गृहमंत्री मुहिद्दीन यासीन यांनी केली होती.