मागील काही दिवसांपासून इस्लामिक राष्ट्रांमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन आणि फ्रान्स सरकारविरुद्ध निर्दर्शने केली जात आहेत. इस्लाम धर्माबद्दल मॅक्रॉन यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अनेक मुस्लिमबहुल देशांकडून त्यांचा निषेध केला जात आहे. मात्र याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारतामध्ये धार्मिक द्वेष परसवल्याच्या आरोपाखाली फरार असलेला वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक झाकीर नाईकने पुन्हा एकदा आगीत तेल ओतणारे वक्तव्य केलं आहे.

झाकीर नाईकने आपल्या फेसबुक पेजवर केलेल्या एका पोस्टमध्ये “अल्लाहचा संदेश घेऊन येणाऱ्याला (प्रेषित) शिवीगाळ करणाऱ्याला एक वेदनादायक शिक्षा मिळेल,” असं म्हटलं आहे. ज्या पद्धतीने सध्या मॅक्रॉन यांच्याविरोधात इस्लामिक राष्ट्र एकवटल्याचे चित्र दिसत आहे त्यावरुन नाईकने मॅक्रॉन आणि फ्रान्सलाच हा इशारा दिल्याचे म्हटले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून नाईकच्या फेसबुक पेजवर फ्रान्स आणि तेथील उत्पादनांवर बंदी घालण्यासंदर्भातील पोस्टबरोबर मॅक्रॉन यांना विरोध करणाऱ्या पोस्टही केल्या जात आहे.

झाकीर नाईकने अशाप्रकारे द्वेष पसरवणारी पोस्ट लिहीण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. या पूर्वीही त्याने एका व्हिडीओमध्ये बिगर मुस्लिम भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. मुस्लिम देशांना आवाहन करताना, अल्लाहचे प्रेषित असणाऱ्या मोहम्मद पैगंबारांवर टीका करणाऱ्या बिगर मुस्लिम भारतीयांना तुरुंगात टाकावे असं झाकीर म्हणाला होता. तसेच पैगंबारांवर टीका करणारे अनेकजण हे भाजपाशी संबंधित असल्याचा दावाही त्याने केला होता.

नाईकने सौदी अरेबिया, इंडोनेशियाबरोबरच मुस्लिम देशांना पैगंबरांवर टीका करणाऱ्या भारतीयांचा डेटाबेस तयार करावा असं आवाहन केलं होतं. पैगंबरांवर टीका करणारे भारतीय इस्लामिक देशांमध्ये प्रवेश करतील तेव्हा त्यांना अटक करावी असंही नाईक म्हणाला. इस्लामिक देशांनी मुस्लिम नसणाऱ्या भारतीयांकडून होणाऱ्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि अपशब्दांचा एक डेटाबेस तयार करुन तो स्टोअर करुन ठेवावा असं मतही नाईकने व्यक्त केलं होतं.

पैगंबरांवर टीका करणारे भारतीय लोकं पुढच्या वेळेस कुवेत असो किंवा सौदी अरेबिया असो किंवा इंडोनेशिया असो अशा कोणत्याही आखाती देशांमध्ये गेल्यास त्यांची चौकशी करण्यात यावी. त्यांनी इस्लाम तसेच पैगंबरांबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं नाहीय नाहीय याचा शोध घेण्यात यावा. त्यांनी असं केल्याचं आढळल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तुरुंगात टाकण्यात यावा. आपल्याकडे डेटाबेस असल्याचे देशांनी सार्वजनिक पद्धतीने जाहीर करावे मात्र नावांची घोषणा करु नये. हे लोकं मुस्लिम देशांमध्ये आल्यास त्यांना अटक करावी, असं नाईक म्हणाला.

नाईक स्वत: मागील चार वर्षांपासून मलेशियामध्ये वास्तव्य करत आहे. इस्लाम आणि पैगंबरांवर टीका करणाऱ्यांवर खटला चालवण्याची मागणी नाइकने केलीय. माझ्यावर विश्वास ठेवा यापैकी बहुतांश लोक हे भाजपा समर्थक आहेत. हे लोकं इस्लाम आणि मुस्लिमांविरोधात विष पसरवण्याचं काम करत असून अशी कारवाई केल्यास ते नक्कीच घाबरतील असा विश्वासही नाईकने व्हिडीओमधून व्यक्त केला होता.