नवी दिल्ली : सक्तवसुली संचालनालयाने (इडी) इस्लामी प्रचारक झाकीर नाईक याच्या साथीदाराला मुंबईत अटक करण्यात आली. दरम्यान याप्रकरणी नवीन पुराव्यांच्या आधारे नवे आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले

अब्दुल कादीर नजमुद्दीन साथक असे त्याचे नाव असून त्याचा सराफी व्यवसाय आहे. त्याला पीएमएलए म्हणजे काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये अटक करण्यात आली. त्याने नाईक याला मदत केली असून संयुक्त अरब अमिरातीतील अज्ञात व संशयास्पद खात्यातून पैसे नावे करण्यात साथक याचा हात होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार साथक याने नाईक याला ५० कोटी रुपयांचा निधी गैरमार्गाने मिळवून दिला होता. साथक हा मे. ग्लोबल ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन या नाईक याच्या पीस टीव्ही चॅनेलची मालकी असलेल्या कंपनीचा संचालक आहे. त्याला मुंबई पीएमएलए न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. नाईक याची २०१६ पासून चौकशी सुरू आहे. त्याच्या इस्लामिक रीसर्च फाउंडेशन या संस्थेवर पाच वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली होती. भारतीय सुरक्षा संस्थांनी त्याच्यावर सतत लक्ष ठेवले असून ढाका येथील १ जुलै २०१६ मधील हल्ल्यात सामील दहशतवाद्यांना नाईक याने प्रोत्साहित केले होते. त्या हल्ल्यात २२ जण ठार झाले होते. नाईक हा भारताला दहशतवादी कारवाया व द्वेषमूलक भाषणांच्या प्रकरणात हवा असून तो २०१६ मध्ये देश सोडून गेला आहे. मलेशियाने त्याला नागरिकत्व दिले आहे.