वादग्रस्त मुस्लिम उपदेशक झाकीर नाईक ओसामा बिन लादेनचे गुणगान गात होता, तसंच प्रत्येक मुस्लिम व्यक्तीने दहशतवादी असायला हवे, असे तो म्हणायचा, अशी माहिती गृहमंत्रालयाने दिली आहे. झाकीर नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालण्याचा निर्णय योग्य असल्याचेही म्हटले आहे. मुस्लिमांची इच्छा असती तर ८० टक्के भारतीय हिंदू राहिलेच नसते, असाही दावा तो करायचा, अशी माहितीही गृहमंत्रालयाने दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घातल्यानंतर गृहमंत्रालयाने त्यासंबंधी अधिसूचना जाहीर केली आहे. आयआरएफ, सदस्य आणि संस्थापक अध्यक्ष झाकीर नाईक त्यांच्या अनुयायांना धर्माच्या नावाखाली लोकांमध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करायचा किंवा तसा प्रयत्न करायचा. तसेच त्यांना त्यासाठी मदतही करायचा, असे त्यात म्हटले आहे. झाकीरची वक्तव्ये किंवा भाषणे वादग्रस्त होती. कारण ओसामा बिन लादेनसारख्या दहशतवाद्याचे तो गुणगान गात होता. आम्ही जर ठरवले असते तर तलवारीने हिंदूंचे धर्मांतर घडवून आणले असते,
अशी माहिती केंद्र सरकारला मिळाली होती, असे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

आत्मघाती हल्ल्यांचे तो समर्थन करत असे. सुवर्ण मंदिर मक्का आणि मदिनाइतका पवित्र असूच शकत नाही, असे तो म्हणत होता. इतर धर्मांविरोधात तो अपमानास्पद वक्तव्ये करत होता, असेही गृहमंत्रालयाने म्हटले आहे. झाकीरची फूट पाडणारी विचारधारा आपल्या देशाची धर्मनिरपेक्षता आणि विविधतेच्या विरोधात आहे, असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे. दहशतवादी हल्ल्यांच्या घटनेत अटक केलेले दहशतवादी, तसेच आयसिसच्या समर्थकांनी ते नाईक यांच्या विचारांनी प्रभावित होते, अशी कबुली दिली आहे, असेही अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इस्लामिक रिसर्च फाऊंडेशन ही संघटना बेकायदेशीर असल्याची घोषणा करण्याचा सरकारचा विचार आहे. हे कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे. कारण झाकीरच्या संघटनेच्या विचारातून अनेक तरुण दहशतवादी कारवायांसाठी प्रेरित होतील, अशी शक्यता आहे, असे गृहमंत्रालयाचे संयुक्त सचिव सुधीरकुमार सक्सेना यांनी सांगितले.