वादग्रस्त मुस्लिम धर्मप्रचारक डॉ. झाकीर नाईकला भारताकडे सोपवण्यास मलेशिया सरकार तयार झाल्याचे वृत्त आहे. झाकीर नाईकला आजच (बुधवारी) भारतातील तपास यंत्रणाकडे सोपवले जाईल, असे सांगितले जात असून रात्री उशिरापर्यंत तो भारतात परतेल, असे समजते.

चिथावणीखोर भाषणांद्वारे तरुणांना दहशतवादाकडे वळण्यास प्रवृत्त करण्यासह बनावट कंपन्यांच्या माध्यमातून निधी गोळा करून तो दहशतवादी कारवायांसाठी उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी डॉ. झाकीर नाईकविरोधात गुन्हा दाखल आहे. बेकायदा कारवाया करणाऱ्या संघटनेचा सदस्य असणे, फौजदारी कट कारस्थानाचा भाग असणे आणि बेकायदा कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप झाकीर नाईकवर आहे.

नाईक सध्या मलेशियात असून त्याच्या हस्तांतरणाची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती सरकारने जूनमध्ये मुंबई हायकोर्टात दिली होती. या पार्श्वभूमीवर ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनीने मलेशियातील सूत्रांच्या आधारे झाकीर नाईक बुधवारी भारतात परतणार, असे वृत्त दिले आहे. मलेशिया सरकार झाकीर नाईकला भारताकडे सोपवण्यास तयार असून बुधवारी रात्री उशिरा झाकीर नाईक विमानाने भारताकडे रवाना होईल, असे मलेशियातील सूत्रांनी ‘एनडीटीव्ही’ला सांगितले.

वाचा: प्रत्यार्पणाच्या वृत्ताबाबत काय म्हटलंय झाकीर नाईकने

झाकीर नाईकला इतके दिवस आश्रय का दिला, असा प्रश्न विचारला असता मलेशियातील सूत्रांनी ‘याचे उत्तर मलेशियातील आधीच्या सत्ताधाऱ्यांना विचारा’, असे सांगितले. मलेशियात मे महिन्यात सत्ताबदल झाला. ९२ वर्षीय महाथीर मोहम्मद यांनी निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला होता. यानंतर मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना  दोन दिवसांपूर्वीच भ्रष्टाचाराप्रकरणी अटक झाली होती.