काळा पैसा प्रकरणी चौकशीतील कारवाईत इस्लामी धर्मप्रसारक झाकीर नाईक याच्या १६.४०कोटी रूपये किमतीच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. तपास संस्थेच्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई व पुणे येथे झाकीर नाईकची मालमत्ता असून त्यावर काळा पैसा प्रतिबंधक कायद्यान्वये टाच आणण्यात आली आहे. या स्थावर मालमत्तांची किंमत १६.४० कोटी रुपये आहे. सक्तवसुली संचालनालयाने त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्याची ही तिसरी वेळ आहे. संचालनालयाने  राष्ट्रीय तपास संस्थेच्या प्राथमिक माहिती अहवालाच्या आधारे ही कारवाई केली आहे. झाकीर नाईक सध्या मलेशियात असून त्याचा धर्मप्रसार व अशांततेतील सहभाग स्पष्ट करण्यासाठी पुरावे दिले तरच त्याला भारताच्या ताब्यात दिले जाईल अशी भूमिका मलेशियाने घेतली आहे. सक्तवसुली संचालनालयाच्या आतापर्यंतच्या माहितीनुसार त्याच्या ५०.४९ कोटींच्या मालमत्तेवर टाच आणण्याची कारवाई करण्यात आली आहे. इस्लामिक रीसर्च फाउंडेशन व हार्मनी मीडिया या दोन संस्थांनी त्याच्या भाषणाचा प्रसार केला असून त्याने नेहमी हिंदू, ख्रिश्चन देवतांची टिंगल केली आहे. झाकीर हुसेनच्या खात्यातील ३४.०९ कोटी व नंतर ४९.२० कोटी अशा रकमा आधीच गोठवण्यात आल्या आहेत. त्याचा बराच पैसा हा अज्ञात स्रोतातून मिळालेला असून त्याने त्यातून सलीम कोडिया (भागीदार एमके एंटरप्रायजेस), मुनाफ वडगमा (भागीदार आफिया रिअ‍ॅल्टर्स) समीर खान (भागीदार पॅसिफिक ओरिएंट जेनेसिस असोसिएटस), मुसा लकडावाला ( भागीदार लकडावाला अँड यश असोसिएटस) यांच्या प्रकल्पात मालमत्ता खरेदी केली त्यात फातिमा हाईटस (मुंबई), आफिया हाइटस (मुंबई) एनग्रॅशिया (पुणे) तसेच भांडुपमधील एका प्रकल्पातील स्थावर मालमत्ता खरेदीचा समावेश आहे.