विद्यापीठ प्रवेशासाठी अर्ज करताना अर्जातील निबंधामध्ये ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ असे शंभर वेळा लिहिणाऱ्या झियाद अहमद या विद्यार्थ्याची स्टॅनफोर्ड विद्यापीठात निवड करण्यात आली आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठ हे जगातील प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक समजले जाते. या निवडीमुळे झियादलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ‘व्हॉट मॅटर्स टू यू अॅंड व्हाय’ या विषयावर शंभर शब्दांचा निबंध लिहा असे अर्जात सांगण्यात आले होते. त्याने त्या ठिकाणी केवळ ब्लॅक लाइव्हस मॅटर असे शंभर वेळा लिहिले. झियाद हा प्रिंसटन भागात राहतो आणि कृष्णवर्णिय, महिला आणि पर्यावरणाच्या हक्कांसाठी लढतो.

आपल्या आयुष्यात सर्वाधिक महत्त्व याच गोष्टीला आहे. त्यामुळे ब्लॅक लाइव्हस मॅटर शंभर वेळा लिहिण्याची संधी आहे असा विचार करुनच आपण तो अर्ज भरला. परंतु, त्याची निवड झाली. तुमचा गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टीकोन अगदी अनोखा आहे आणि तुम्ही जे करता ते अगदी मनापासून करता असे उत्तर स्टॅनफोर्डने झायेदला दिले आहे. तुमच्या या वेगळ्या विचारपद्धतीचा इतर विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि तुम्ही विद्यापीठामध्ये उत्तम कामगिरी बजावू शकाल असे स्टॅनफोर्डने म्हटले आहे.

झियादच्या वेगळ्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे त्याची निवड झाल्याबद्दल सगळीकडेच आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही देखील यापुढे आमच्या अर्जात असेच काहीतरी लिहू असे देखील काही जणांनी म्हटले आहे. परंतु, केवळ त्याच्या याच उत्तरामुळे त्याची निवड झाली असे म्हणता येणार नाही. झायेद केवळ १८ वर्षांचा आहे, परंतु समाजातील शोषितांसाठी लढण्याची त्याची उमेद पाहून कुणीही थक्क होईल.  तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याला व्हाइट हाउसवर झालेल्या इफ्तार पार्टीला निमंत्रण दिले होते.

त्याची सामाजिक क्षेत्रातील आवड आणि अभ्यास पाहून डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्यासोबत इंटर्नशिप करण्याची देखील त्याला संधी मिळाली होती.  विद्यापीठात प्रवेशासाठी खूप स्पर्धा होती. एका जागेसाठी किमान २० अर्ज त्यांच्याकडे आले होते. परंतु त्याच्या वेगळेपणामुळे त्याची निवड करण्यात आली. स्टॅनफोर्ड व्यतिरिक्त त्याला येल विद्यापीठ आणि प्रिंसटन विद्यापीठाचेही निमंत्रण मिळाले आहे. कुठे प्रवेश घ्यायचा याचा तो सध्या विचार करत आहे.