19 December 2018

News Flash

झिम्बाब्वेत लष्कर रस्त्यावर, सरकारी वाहिनीवर ताबा

मुगाबे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे लष्कराने सांगितले.

झिम्बाब्वेमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून बुधवारी सकाळी येथील सरकारी वाहिनीवर लष्कराने ताबा मिळवल्याचे वृत्त येत आहे. (छायाचित्र:रॉयटर)

झिम्बाब्वेमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असून बुधवारी सकाळी येथील सरकारी वाहिनीवर लष्कराने ताबा मिळवल्याचे वृत्त येत आहे. लष्कराकडून मात्र याचा इन्कार करण्यात आला आहे. लष्कराच्या एका प्रवक्त्याने सत्तांतरण झाल्याचे वृत्त नाकारले आहे. आम्ही सत्तांतरण करत नसून उलट राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबेंच्या आसपास असलेल्या गुन्हेगारांवर निशाणा साधत आहोत. मुगाबे आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एका जनरलने सरकारी वाहिनीवरून थेट प्रक्षेपणादरम्यान लष्कराने सत्तांतरण केले नसल्याचे स्पष्ट केले.

आम्ही देशाला आश्वस्त करू इच्छितो की, राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित आहेत. त्यांच्या सुरक्षेची आम्ही हमी देतो. आम्ही केवळ त्यांच्या जवळ असलेल्या गुन्हेगांरावर निशाणा साधत आहोत. आम्ही अपेक्षा करतो की, लवकरच हे अभियान संपेल आणि परिस्थिती सर्वसामान्य होईल, असे या जनरलने म्हटले.

वर्ष १९८० मध्ये ब्रिटनपासून स्वतंत्र झाल्यानंतर झिम्बाब्वेवर राष्ट्राध्यक्ष मुगाबे यांची सत्ता आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून ‘प्रशासनावरील त्यांच्या पकडीवरून मोठे प्रश्न उपस्थित झाले होते. त्याचदरम्यान आज देशाची राजधानी हरारे येथे लष्कराने रणगाडे रस्त्यावर आणले. गेल्या काही दिवसांपासून लष्कर आणि ९३ वर्षीय मुगाबे यांच्यातील तणाव वाढल्याचे दिसून आले.

एक प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी बोरोडाले उपनगरात मुगाबे यांच्या निवासस्थानी खूप वेळ गोळीबार सुरू होता. दरम्यान, मंगळवारी मुगाबे यांच्या जेडएएनयू-पीएफ पक्षाने लष्करप्रमुख जनरल कॉन्सटंनटिनो चिवेंगा यांच्यावर राजद्रोहाचा आरोप केला होता. त्याचवेळी ही कारवाई झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मुगाबे यांच्या प्रकृतीच्याही तक्रारी वाढल्या आहेत. चिवेंगा यांनी उपराष्ट्राध्यक्ष एमरसन मनांगाग्वा यांची बरखास्ती मागे घेण्याची मुगाबेंकडे मागणी केली होती.

 

 

First Published on November 15, 2017 1:11 pm

Web Title: zimbabwe army on the streets control of the government channel robert mugabe