25 November 2017

News Flash

दीड कोटी ‘झोमॅटो’ वापरकर्त्यांची माहिती चोरीला!

‘नॅक्ले’ हॅकरने जबाबदारी स्वीकारली

पीटीआय, नवी दिल्ली | Updated: May 19, 2017 2:26 AM

हॅकरहेड.कॉमच्या माहितीनुसार ‘नॅक्ले’ नावाच्या हॅकरने ‘झोमॅटो’च्या माहितीचोरीची जबाबदारी स्वीकारली आहे.

‘नॅक्ले’ हॅकरने जबाबदारी स्वीकारली; कंपनीकडूनही कबुली

आपल्या परिसरातील चांगल्या हॉटेलांचा पर्याय सुचविणारे संकेतस्थळ व अ‍ॅप ‘झोमॅटो’च्या एक कोटी ७० लाख वापरकर्त्यांचा तपशील चोरीला गेल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी उघडकीस आला. यामध्ये वापरकर्त्यांचे ‘ई-मेल पत्ते’ आणि ‘पासवर्ड’चाही समावेश आहे. माहिती चोरीला गेल्याची कबुली देतानाच वापरकर्त्यांच्या बँक खात्यांचे तपशील सुरक्षित असल्याचे ‘झोमॅटो’तर्फे स्पष्ट करण्यात आले.

हॅकरहेड.कॉमच्या माहितीनुसार ‘नॅक्ले’ नावाच्या हॅकरने ‘झोमॅटो’च्या माहितीचोरीची जबाबदारी स्वीकारली आहे. ही माहिती चोरून तिची विक्री करण्याचा मानस असल्याचे हॅकरने संदेशात नमूद केले आहे. या माहितीचे मूल्य १००१.४३ अमेरिकन डॉलर एवढे असल्याचेही संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे. वापरकर्त्यांचा सर्व तपशील चोरी करण्यात आला असला तरी ‘पासवर्ड’चा भाग सुरक्षित आहे. यामुळे वापरकर्त्यांनी ‘पासवर्ड’ बदलावा व नव्या ‘पासवर्ड’च्या साह्य़ाने खाते वापरावे, असे आवाहन कंपनीने केले आहे. आमच्या संकेतस्थळावर दरमहा साधरणत: एक कोटी २० लाख वापरकर्ते भेट देत असतात. नियमित तपासणीदरम्यान आमच्या प्रणालीतील सुमारे एक कोटी ७० लाख वापरकर्त्यांचा तपशील चोरीला गेल्याची बाब लक्षात आली. नियमित वापरकर्त्यांचा ‘पासवर्ड’ही चोरीला गेल्याचे लक्षात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. वापरकर्त्यांच्या बँकेचा अथवा पैसे भरणा करण्याचा तपशील वेगळ्या सव्‍‌र्हरवर ठेवला जातो. यामुळे तो तपशील सुरक्षित असल्याचेही कंपनीने नमूद केले आहे. वापरकर्त्यांनी ‘पासवर्ड’ बदलून लॉगइन केल्यावर त्यांचे सुरक्षित खाते सुरू होईल असेही कंपनीने स्पष्ट केले.

कंपनी म्हणते..

  • आमच्या संकेतस्थळावर दरमहा साधरणत: एक कोटी २० लाख वापरकर्ते भेट देतात.
  • नियमित तपासणीत आमच्या प्रणालीतील सुमारे एक कोटी ७० लाख वापरकर्त्यांचा तपशील चोरीला गेल्याची बाब लक्षात आली.
  • नियमित वापरकर्त्यांचा ‘पासवर्ड’ही चोरीला गेले.

First Published on May 19, 2017 2:26 am

Web Title: zomato app hacked