करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. १७ मे पर्यंत लॉकडाउनचा कालावधी वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. तर तिसऱ्या टप्प्यात सरकारनं रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तिनही झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. परंतु मद्यविक्री करणाऱ्या दुकांनांसमोर मोठ्या रांगा लागल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच ऑनलाइन फुड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोनं ऑनलाइन मद्यविक्रीच्या परवानगीसाठी एक प्रस्ताव सादर केला आहे.

लॉकडाउनमुळे हॉटेल व्यवसायावर निर्बंध आले आहेत. तसंच काही रेस्तराँ बंद ठेवण्यात आली आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक लोक बाहेरून खाद्यपदार्थ मागवण्यासही संकोच करताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ऑनलाइन फुड डिलिव्हरी कंपन्यांच्या व्यवसायावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. दरम्यान, झोमॅटोनं इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला (ISWIA) ऑनलाइन मद्यविक्री करण्यासाठी एक प्रस्ताव पाठवला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं रॉयटर्सच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सध्या देशभरात सरकारनं मद्यविक्रीसाठी परवानगी दिली आहे. दिल्लीतही राज्य सरकारनं मद्यविक्रीवर ७० टक्क्यांचा विशेष करोना कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात ऑनलाइन मद्यविक्री करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कायदेशीर तरतूद नाही.

आणखी वाचा- आजपासून या दोन राज्यांमध्ये दारुची ‘होम डिलिव्हरी’

“तंत्रज्ञानावर आधारित मद्याच्या घरपोच विक्रीमुळे मद्यविक्रीत वाढ होऊ शकते,” असं मत झोमॅटो फुड डिलिव्हरी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित गुप्ता यांनी इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला पाठवलेल्या प्रस्तावात म्हटलं आहे. १८ ते २५ वर्षांवरील व्यक्तींनाच मद्यसेवनाची परवानगी आहे. तसंच प्रत्येक राज्यांमध्ये हे वय वेगवेगळं आहे. “करोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या ठिकांवर झोमॅटो लक्ष केंद्रीत करत आहे,” असं गुप्ता यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. रॉयटर्सला यासंदर्भातील काही डॉक्युमेंट्स सापडली आहेत.

“लॉकडाउनमुळे राज्यांच्या महसूलावर परिणाम झाला आहे. तो वाढवण्यासाठी राज्यांनी मद्याच्या ऑनलाइन विक्रीसाठी परवानगी द्यावी. मद्य विक्रीतून मिळणारा महसूल अद्याप उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करणे आव्हान आहे,” असं मत इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी अध्यक्ष अमरित किंरण सिंह यांनी रॉयटर्सशी बोलताना व्यक्त केलं. स्विगी ही कंपनी झोमॅटोची मुख्य स्पर्धत आहे. यां कपनीला चीनच्या टेन्सेन्टचं पाठबळ आहे. या कंपनीदेखील इंटरनॅशनल स्पिरिट्स अँड वाईन असोसिएशन ऑफ इंडियाला संपर्क केल्याची माहिती सिंह यांनी दिली. दरम्यान, स्विगीनं मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.