नवी दिल्ली: झायडस कॅडिलाने तयार केलेल्या ‘झायकोव-डी’  या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना भारताच्या महाऔषधनियंत्रकांनी परवानगी दिली आहे. ‘पेगीहेप’ या जैविक उपचार पद्धतीच्या चाचण्यांनाही परवानगी देण्यात आली आहे. करोना प्रतिबंधक लस निर्मिती यशस्वीरीत्या  करण्यासाठी  कंपन्यांमध्ये चढाओढ सुरू असताना झायडसला ही परवानगी मिळाल्याने त्यांनी एक मोठा टप्पा ओलांडला गेला आहे.

झायडस  कॅडिलाने ‘पेगीहेप’ उपचार पद्धतीच्या पहिल्या दोन वैद्यकीय चाचण्या गेल्या महिन्यात केल्या होत्या. त्यानंतर ही उपचार पद्धत व लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी परवानगीकरिता अर्ज केला होता. या चाचण्या डिसेंबरमध्ये सुरू होणार असून भारतातील २०—२५ केंद्रात २५० स्वयंसेवकांना ही लस दिली जाणार आहे. कॅडिला हेल्थकेअर लि.चे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले, की पेगीलेटेड  इंटरफेरॉन  अल्फा २ बी या उपचारपद्धतीचे दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष उत्साहवर्धक असून रुग्णांना हे उपचार दिल्यानंतर विषाणूंची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.  नव्या उपचारपद्धतीने कोविड १९ वर चांगल्या पद्धतीने मात करता येईल. मेक्सिकोत या उपचार पद्धतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरू असून अमेरिकी अन्न व औषध प्रशासनाकडे ‘पेगीहेप’च्या वैद्यकीय चाचण्यांसाठी अर्ज करण्यात येईल.

देशातील बाधितांची संख्या ९५.७१ लाखांवर

देशातील करोनाबाधितांची संख्या ९५.७१ लाख इतकी झाली असून  बरे होणाऱ्यांची संख्या ९० लाखांवर गेली आहे. त्यामुळे करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९४.२० टक्के इतके झाले आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आले. देशात २४ तासांत ३६ हजार ५९५ जणांना करोनाची लागण झाल्याने एकूण बाधितांची संख्या ९५ लाख ७१ हजार ५५९ वर पोहोचली आहे.