हेपॅटायटिसवरील ‘अल्फा २ बी’ या औषधाचा वापर कोविड १९ रुग्णांवर करण्यासाठी झायडस कॅडिला या कंपनीने सोमवारी भारताच्या औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे. ‘पेगिलेटेड अल्फा २ बी’ या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्या पूर्ण झाल्या असून त्याचे निष्कर्ष सकारात्मक आले आहेत. ‘पेगी हेप’ नावाचे हे औषध असून ते त्या नावाने विकले  जाते.

अंतरिम निष्कर्षानुसार या औषधाने  कोविडचे रुग्ण लवकर बरे होऊ शकतात, तसेच त्यांच्या प्रकृतीत निर्माण होणारी गुंतागुंत वाढत नाही. शिवाय रुग्णाची प्रकृती गंभीर बनत नाही. ही उपचारपद्धती जास्त गुंतागुंतीची नाही. पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा २ बी चा एक डोस दिला तरी रुग्णांना त्यामुळे चांगला दिलासा मिळतो. पेगीआयएफएन हे औषध हेपॅटिटिस बी व सी रुग्णांसाठी दिले जाते.  अनेक वर्षे त्याचा वापर सुरू आहे.

पेगिलेटेड इंटरफेरॉन अल्फा २ बी या औषधाच्या चाचण्या घेतल्यावर असे दिसून आले आहे,की या औषधामुळे रुग्णांना ऑक्सिजनवर ठेवण्याची वेळ येत नाही. करोनाच्या विषाणूमुळे श्वसनसंस्थेवर होणारा परिणामही विकोपास जात नाही. हे सगळे सकारात्मक निष्कर्ष हाती आल्यानंतर आता पेगीआयएफएन या औषधाचा वापर कोविड १९ रुग्णांवर करण्यासाठी महा औषधनियंत्रकांकडे परवानगी मागण्यात आली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या २५० रुग्णांवर देशातील २०-२५ केंद्रात करण्यात आल्या आहेत. त्याचे सविस्तर निकाल वैज्ञानिक नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

तिसऱ्या टप्प्यात पेगिलेटेड  इंटरफेरॉन अल्फा २ बी या औषधाच्या चाचण्यांनी त्याची क्षमता सिद्ध झाली आहे. या औषधामुळे विषाणूंची संख्या कमी राहण्यास मदत होते असेही दिसून आल्याचे कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक शर्विल पटेल यांनी सांगितले.