‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना दिल्ली हायकोर्टाने प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून माफी मागण्याचे आदेश दिले आहेत. न्यायाधीश अवमानप्रकरणी कोर्टाने त्यांना चांगलंच फटकारलं. गौतम नवलखा यांना जामीन दिल्यानंतर विवेक अग्निहोत्री यांनी न्यायाधीश ‘पक्षपाती’ असल्याचं ट्वीट केलं होतं. दरम्यान, विवेक अग्निहोत्री यांच्या माफीनाम्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘नवे माफीवीर’ असा टोला लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया यांनी ट्वीट केलं असून ‘शहरात नवे माफीवीर आले’ असल्याचा टोला लगावला आहे. तसंच यावर ‘माफी फाइल्स’ चित्रपट बनवला पाहिजे अशी खिल्लीही उडवली आहे.

“शहरात एक ‘नवे माफीवीर’ आले आहेत. द्वेषपूर्ण चिंटूने कोर्टात माफी मागितली आहे. त्यांनी आपण ट्वीट डिलीट केल्याचं कोर्टात खोटं बोलल्याचंही सिद्ध झालं आहे. ते ट्विट तर ट्विटरने डिलीट केलं होतं. आता एक ‘माफी फाइल्स’ही बनवला पाहिजे,” असं सुप्रिया यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

स्वत: हजर होऊन पश्चात्ताप झाल्याचे दाखवा; कोर्टाने अग्निहोत्रींना खडसावले

एका न्यायाधीशांचा अवमान केल्याप्रकरणी लेखी माफी मागितल्यानंतरही चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री यांना प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहून पश्चात्ताप झाल्याचे दाखवा, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले. न्यायालयात हजर राहण्यात काही अडचण आहे का, असा प्रश्नही न्या. सिद्धार्थ मृदुल आणि न्या. तलवंत सिंह यांच्या खंडपीठाने केला.

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना दिलासा दिल्याप्रकरणी अग्निहोत्री यांनी एका न्यायाधीशांवर ‘पक्षपाती’ असल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल झाली होती. त्यानंतर अग्निहोत्री यांनी शपथपत्राद्वारे बिनशर्त माफी मागितली. मात्र यावर न्यायालयाचे समाधान झाले नाही. ‘त्यांना प्रत्यक्ष हजर होऊन माफी मागण्यात काही अडचण आहे का? पश्चात्ताप हा केवळ शपथपत्राद्वारेच व्यक्त होऊ शकत नाही.’ न्यायालयासमोर हजर होणे ही त्रासदायक गोष्ट नाही, असेही न्यायालयाने अग्निहोत्रींच्या वकिलांना सुनावले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ मार्च २०२३ रोजी निश्चित करण्यात आली असून त्या वेळी अग्निहोत्री यांनी स्वत: हजर राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले.

काय घडले?

ऑक्टोबर २०१८ मध्ये दिल्ली उच्च न्यायालयातील तत्कालीन न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांच्या न्यायालयाने नवलखांना जामीन दिला होता. त्यावर न्यायाधीश पक्षपाती असल्याचा आरोप ट्विटरद्वारे अग्निहोत्री यांनी केला होता. आता न्या. मुरलीधर हे ओदिशा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत.

ट्वीट कुणी काढले?

अग्निहोत्री यांनी शपथपत्राद्वारे माफी मागतानाच स्वत: अवमानकारक ट्वीट स्वत:हून काढून टाकल्याचे सांगितले. मात्र न्यायालयाने नेमलेल्या न्यायमित्रांनी (एमीकस क्युरी) ट्विटरने ते ट्वीट काढून टाकल्याचे निदर्शनास आणून दिले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress leader supriya shrinate tweet over vivek agnihotri apology calls mafiveer sgy
First published on: 07-12-2022 at 13:36 IST