राम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून १ कोटी; अयोध्येत उद्धव ठाकरेंची घोषणा

योगी सरकारकडे अयोध्येत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा देण्याचे आवाहन

उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अयोध्या दौऱ्यादरम्यान केली. त्याचबरोबर त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येत महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची विनंतीही केली. अयोध्येत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, “राम मंदिर होईल की नाही… ते कोण बनवेल… याबाबत आधी चर्चा सुरु होती. तेव्हा शिवसेनेची मागणी होती की केंद्र सरकारने राम मंदिराच्या निर्मितीसाठी कायदा बनवावा, तो कायदा तर झाला नाही. मात्र, आता हा प्रश्न सुटला आहे. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा इथं आलो होतो, त्यानंतर मी पुन्हा इथं येईल असं म्हटलं होतं. त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे.”

स्वप्नातही वाटलं नव्हतं मुख्यमंत्री होईल – उद्धव ठाकरे

“मला स्वप्नातही वाटलं नव्हत की मी मुख्यमंत्रीपदी विराजमान होईल, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नोव्हेंबरमध्ये मी पहिल्यांदा अयोध्येत आलो होतो आणि एक वर्षानंतर नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री झालो, असा योगायोगही यावेळी त्यांनी सांगितला. कालच मला कळालं की ट्रस्टचं एक बँक अकाऊंट तयार झालं आहे. त्यामुळे शिवसेना ट्रस्टच्यावतीनं १ कोटी रुपयांचा निधी आम्ही राम मंदिराच्या उभारणीसाठी देत आहोत. याचा ट्रस्टने स्विकार करावा, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

कोरोना व्हायरसमुळं शरयूची आरती रद्द

शरयू नदीच्या तिरावर आरती करण्याची आमची इच्छा होती. मात्र, जगभरात पसरत असलेल्या करोना व्हायरसमुळे खबरदारी म्हणून ती स्थगित करावी लागली. मात्र, शरयू नदीची आरती करण्यासाठी मी पुन्हा येईन, असंही यावेळी ठाकरे म्हणाले.

योगी सरकारनं ‘महाराष्ट्र भवन’साठी जागा द्यावी

“महाराष्ट्रातून जे रामभक्त इथं येतील त्यांची राहण्याची सोय व्हावी म्हणून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आम्हाला इथं जागा उपलब्ध करुन द्यावी, याठिकाणी आम्ही ‘महाराष्ट्र भवन’ उभारू अशी विनंती मी महाराष्ट्र सरकारच्यावतीनं करतो,” असंही यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले. दरम्यान, पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आम्ही भाजपापासून वेगळे झालो आहोत हिंदुत्वापासून नाही. भाजपा हे हिंदुत्व नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपाला टोलाही लगावला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 1 crore from shiv sena for construction of ram temple cm declares in ayodhya aau

ताज्या बातम्या