उत्तर प्रदेशात १५ चकमकी;एक गुंड ठार, २४ अटकेत

नागलाखेपाड जंगलात शुक्रवारी त्याला विशेष कृती दलाच्या पथकाने ठार केले.

उत्तर प्रदेश पोलीस

उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्य़ांत गेल्या दोन दिवसांत झालेल्या १५ चकमकींमध्ये एक गुंड ठार झाला असून, पोलिसांनी २४ गुन्हेगारांना अटक केली. उत्तर प्रदेशचे नवे पोलीस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर गुन्हेगारांविरुद्धची कारवाई अधिक तीव्र करण्यात आल्या आहेत.

बुलंदशहर, श्यामली, कानपूर, सहारणपूर, लखनऊ, बागपत, मुझफ्फरनगर, गोरखपूर, हापूर आणि मेरठ या जिल्ह्य़ांमध्ये चकमकी झडल्या. ठार झालेल्या गुंडाला पकडण्यासाठी २५ हजार रुपयांचे इनाम जाहीर केले होते. नागलाखेपाड जंगलात शुक्रवारी त्याला विशेष कृती दलाच्या पथकाने ठार केले. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये लुटालूट आणि हत्येचे ३० गुन्हे त्याच्यावर होते, असे विशेष कृती दलाचे पोलीस अधीक्षक राजीव नारायण सिंह यांनी सांगितले.

पोलिसांनी देशी बनावटीची शस्त्रे, स्फोटके, मोटारसायकल, गाडय़ा, रोख रक्कम जप्त केली असून हा गुन्हेगारांनी लुटलेला ऐवज आहे. बुलंदशहर आणि श्यामली जिल्ह्य़ांत जास्तीतजास्त चकमकी झडल्या आणि तेथून अनुक्रमे चार आणि सहा गुन्हेगारांना अटक करण्यात आली. बुलंदशहरमधून अटक करण्यात आलेल्या तीन गुन्हेगारांवर प्रत्येकी २० हजार रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 1 goon killed in 15 encounters within 60 hours in uttar pradesh

ताज्या बातम्या