Conde Nast Traveler Best Countries 2026 Ranking Reveals: पर्यटन क्षेत्रातील नामवंत नियतकालिक ‘कोंडे नास्ट ट्रॅव्हलर’ने २०२६ सालातील जगातील सर्वोत्तम देशांची क्रमवारी जाहीर केली आहे. ‘रीडर्स चॉइस अवॉर्ड्स’च्या २९ व्या आवृत्तीअंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत ग्रीसने प्रथम क्रमांक पटकावला असून, भारताने पहिल्या २० देशांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. या यादीत भारताला १७ वे स्थान मिळाले आहे.

‘कोंडे नास्ट ट्रॅव्हलर’तर्फे १ एप्रिल ते ३० जून २०२६ या कालावधीत एका सुरक्षित संकेतस्थळाद्वारे जागतिक पातळीवर सर्वेक्षण घेण्यात आले होते. यामध्ये जगभरातील हजारो वाचकांनी मतदान केले. या सर्वेक्षणात हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एअरलाइन्स, शहरे, बेटे आणि क्रूझ लाइन्स यांसारख्या विविध निकषांचा समावेश होता. प्रत्येक घटकाचे मूल्यमापन उत्कृष्ट, अतिशय चांगले, चांगले, सर्वसाधारण आणि सामान्य अशा पाच-स्तरीय मापदंडावर करण्यात आले. या प्रतिसादांचे टक्केवारीत रूपांतर करून सरासरी गुणांच्या आधारे अंतिम क्रमवारी निश्चित करण्यात आली.

ग्रीस ठरला अव्वल

या क्रमवारीत ग्रीसने तब्बल ९८.१४ गुणांसह जगातील सर्वोत्तम देशाचा मान मिळवला आहे. सँटोरिनी, मायकोनोस, क्रीट, पारोस, हायड्रा, आयो आणि तिनोस यांसारख्या प्रसिद्ध बेटांवर सध्या पर्यटकांची विक्रमी गर्दी होत असल्याचे नियतकालिकाने नमूद केले आहे. याशिवाय, ग्रीसची राजधानी अथेन्स केवळ ऐतिहासिक वारशापुरती मर्यादित न राहता नवसंकल्पनांवर आधारित कलादालने आणि आधुनिक हॉटेल्समुळे युरोपमधील एक प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून नावारूपास येत असल्याचेही यात म्हटले आहे.

भारताची १७ व्या क्रमांकावर झेप

या जागतिक क्रमवारीत भारताने ९२.११ गुणांसह १७ वे स्थान पटकावून सर्वोत्तम २० देशांमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने भारताची वाढती लोकप्रियता या सर्वेक्षणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

भारताच्या निर्देशांकाची चर्चा का?

अनेक जागितक निर्देशांकात भारत मागे असल्याची चर्चा नेहमीच होत असते. नागरिकांचे जीवनमान, हक्क, आरोग्य आणि संधी यांच्या आधारे जागतिक निर्देशांक काढले जात असतात. वर्ल्ड हॅप्पीनेस इंडेक्स, मानवी विकास निर्देशांक, जागतिक प्रेस स्वातंत्र्य याबद्दलच्या निर्देशांकाची नेहमीच चर्चा होत असते. अनेक महत्त्वाच्या निर्देशांकात भारत पहिल्या १०० मध्येही नाही. या तुलनेत ‘कोंडे नास्ट ट्रॅव्हलर’तर्फे करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भारताच्या बाबतीत सकारात्मक चित्र दिसते.

जागतिक निर्देशांकअहवालाचे वर्षभारताचा क्रमांकएकूण देश
World Happiness Index२०२६११६वा१४७
Human Development Index२०२५१३०वा१९३
World Press Freedom Index२०२६१५७वा१८०
Global Hunger Index२०२६१००वा१२२
Global Gender Gap Index२०२६१३१वा१४५
Global Peace Index२०२६१२७वा१६३
Global Innovation Index२०२६३८वा१३९
SDG Index२०२६९४वा१६७

जागतिक सर्वोत्त देशात इतर देश कोणते?

या यादीत ग्रीसनंतर जपान दुसऱ्या (९७.०१ गुण), इटली तिसऱ्या (९६.४८ गुण) आणि तुर्की चौथ्या (९४.९० गुण) स्थानावर राहिले. त्यानंतर पोर्तुगाल पाचव्या, कोस्टा रिका सहाव्या तर क्रोएशिया सातव्या स्थानावर आहेत. विशेष म्हणजे, कोस्टा रिका आणि नवव्या स्थानी असलेल्या केनियाने पहिल्यांदाच या यादीतील पहिल्या १० देशांमध्ये धडक मारली आहे. इंडोनेशिया आठव्या, तर थायलंड दहाव्या क्रमांकावर आहे.