संपूर्ण जगात दर ३३ तासांनी १० लाख लोक गरीबीच्या खाईत जात आहेत. या दराने यावर्षी किमान २६.३० कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली जाण्याची शक्यता आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत ‘प्रॉफिटिंग फ्रॉम पेन’ या अहवालात हा दावा केला आहे. मागील दशकांच्या तुलनेत जीवनावश्यक वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

३० तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची वार्षिक बैठक सुरू आहे. ऑक्सफॅम इंटरनॅशनलने आपल्या अहवालात सोमवारी सांगितले की, कोरोना महामारीच्या काळात जगात ३० तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला आहे. उलट या वर्षी आता दर ३३ तासांनी १० लाख लोक गरिबीच्या खाईत जाणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ही सार्वजनिक-खाजगी भागीदारीची आंतरराष्ट्रीय संस्था आहे. दावोसमध्ये दोन वर्षांनंतर त्याची बैठक होत आहे.

अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या २३ वर्षांपेक्षा जास्त वाढ
ऑक्सफॅमच्या अहवालानुसार, महामारीच्या काळात दर ३० तासांनी एक नवीन अब्जाधीश उदयास आला आहे. या दरम्यान एकूण ५७३ लोक नवीन अब्जाधीश झाले आहेत. संस्थेने म्हटले आहे की आम्हाला भीती आहे की यावर्षी दर ३३ तासांनी १० लोकांच्या दराने २६.३० कोटी लोक अत्यंत गरिबीचे बळी होतील. कोविड-१९ च्या पहिल्या दोन वर्षांत अब्जाधीशांच्या संपत्तीत गेल्या २३ वर्षांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. जगातील अब्जाधीशांची एकूण संपत्ती आता जागतिक जीडीपीच्या १३.९ टक्के इतकी आहे. २००० मध्ये ते ४.४ टक्के होते, जे तीन पटीने वाढले आहे.