विश्वाच्या पसाऱ्यात ‘एकटे’च नसल्याचा ठाम विश्वास अंतराळ संशोधनाच्या विकासाला शतकानुशतके बळ देत आला असला, तरी तंत्रप्रगतीच्या आजच्या अवस्थेमध्ये पृथ्वीसमान ग्रहांना हुडकून काढण्याची नवी पद्धती शास्त्रज्ञांनी विकसित केली असून, त्यांच्या मते आपल्या एकटय़ा आकाशगंगेमध्ये पृथ्वीसारखे १०० अब्ज ग्रह सामावलेले आहेत.
नवे काय?
ऑकलंड विद्यापीठातील अभ्यासकांनी ‘ग्रॅव्हिटेशन मायक्रोलेन्सिंग’ म्हणून ही पद्धती विकसित केली आहे. जपान आणि न्यूझीलंड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायक्रोलेन्सिंग ऑब्झर्वेशन इन अ‍ॅस्ट्रोफिजिक्स’ ती न्यूझीलंडमधील अंतराळ संशोधन केंद्रामध्ये वापरली जात होती. त्यात विस्तार करून ऑकलंड विद्यापीठातील अभ्यासक संशोधनाच्या नव्या पायऱ्या गाठणार आहेत. यासाठी ‘नासा’च्या केप्लर दुर्बिणीमधून मिळणाऱ्या माहिती घटकांची जोडही मिळणे आवश्यक असल्याचे ऑकलंड विद्यापीठातील अभ्यासगटाचे प्रमुख डॉ. फील योक यांनी सांगितले.

विशेष काय?
‘नासा’च्या केप्लर दुर्बिणीमध्ये पृथ्वीच्या आकाराचे अनेक ग्रह पितृताऱ्यांच्या जवळ असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपल्या आकाशगंगेतील या पृथ्वीसमान आकाराच्या ग्रहांची संख्या एकूण १७ अब्ज असल्याचे म्हटले आहे. हे ग्रह पृथ्वीहून अधिक उष्ण असावेत, तर थंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाल बुटक्या ताऱ्याजवळ असलेल्या काही ग्रहांवर आपल्या पृथ्वीसारखेच तापमान असू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. पृथ्वी आणि सूर्याच्या दरम्यान अनेक पृथ्वीसदृश ग्रहांची गर्दी आहे. केप्लर दुर्बिणीतील माहितीसाठा आणि ‘ग्रॅव्हिटेशन मायक्रोलेन्सिंग’ यांच्या एकत्रीकरणामधून आपल्या पृथ्वीसारखे किती ग्रह आकाशगंगेमध्ये आहेत, याची निश्चित आकडेवारी हाती येईल, असा विश्वास योक यांना आहे. त्यांच्याच मते पृथ्वीसमान असलेल्या ‘दुनिया’ १०० अब्ज इतक्या संख्येने आहेत. या संशोधनातून या ग्रहांपैकी कुणावर जीवसृष्टी आहे का, याचा पडताळा शोधणे आजच्यासाठी फार दूरची गोष्ट असली, तरीही अंतराळ संशोधन आणखी एक पाऊल पुढे मात्र नक्कीच गेलेले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.