सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती जस्टिस कुरियन जोसेफ यांनी म्हटलं आहे की मी समलैंगिक विवाहांच्या १०० टक्के विरोधात आहे. माजी न्यायाधीश कुरियन जोसेफ म्हणाले की समलिंगी संबंधांना युनियन किंवा असोसिशन म्हटलं जाऊ शकतं मात्र समलिंगी विवाहाच्या संपूर्ण विरोधात आहे असं जस्टिस कुरियन यांनी म्हटलं आहे. Live Law ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
नेमकं काय म्हटलं आहे कुरियन यांनी?
“विवाहाचा उद्देश वेगळा असतो. विवाहचं मूळ हे पुरुष आणि स्त्री यांच्यातलं मीलन आहे. समलिंगी संबंध हे युनियन किंवा असोसिएशनप्रमाणे आहेत. विवाहानंतर स्त्री पुरुष एकत्र येऊन मुलांना जन्म देतात. मी समलिंगी संबंधांच्या विवाहाला मान्यता देण्यास १०० टक्के विरोधात आहे. समलिंगी विवाह नैतिकतेला धरुन नाही. समलिंगी संबंध ठेवणं, एकत्र राहणं, मैत्री असणं, घनिष्ठ मैत्री असणं, खास मित्र असणं हे सगळं असू शकतं. मात्र त्यांच्यात विवाह होऊ शकत नाही. विवाह ही वेगळी संकल्पना आहे. विवाहाला समाजात एक विशेष स्थान आहे. समलिंगी संबंध हा असा प्रकार आहे जो विवाहाच्या मुळांना प्रभावित करु शकतं.” असं मत कुरीयन यांनी म्हटलं आहे.
जोसेफ कुरियन यांनी असंही म्हटलं आहे की सर्वोच्च न्यायालयाकडे सुनावणीसाठी हा मुद्दा आला आहे. मात्र मी त्यावर हे मत मांडू इच्छितो की समलिंगी विवाह असा मुद्दा आहे जो धर्म आणि संस्कृतीशी घट्टपणे जोडला गेला आहे. या मुद्द्यावर नैतिक स्तरावर वाद-विवाद झाले पाहिजेत. याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन असला पाहिजे. मात्र आता प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे त्यामुळे मी यावर फारकाही भाष्य करु इच्छित नाही. माजी न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी मात्र समलिंगी विवाहांच्या मुद्द्यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.