Loan On British Government: मध्य प्रदेशातील सिहोर येथील प्रसिद्ध व्यापारी सेठ जुम्मा लाल रुथिया यांचे कुटुंब १०९ वर्षे जुन्या कर्जाबाबत ब्रिटिश राजघराण्याला (युनायटेड किंग्डम सरकार) कायदेशीर नोटीस पाठवण्याची तयारी करत आहे. १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धादरम्यान व्यापारी रुथिया यांनी ब्रिटिश सरकारला कर्ज दिले होते. आता या कर्जाची वसूली करण्याची तयारी सेठ जुम्मा लाल रुथिया यांचे वंशज करत आहे.

नक्की प्रकरण काय?

बरोबर १०९ वर्षांपूर्वी म्हणजेच १९१७ साली पहिल्या महायुद्धादरम्यान ब्रिटिश सरकारने भोपाळच्या सिहोर येथील प्रसिद्ध व्यापारी सेठ जुम्मा लाल रुथिया यांच्याकडून ३५,००० रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी सेठ जुम्मा लाल रुथिया भोपाळ संस्थानातील एक श्रीमंत व्यक्ती होते. त्याकाळी ही रक्कम खूप मोठी मानली जात होती. दरम्यान, ब्रिटिश सरकारने १०९ वर्षांनंतरही या कर्जाची परतफेड केलेली नाही, असा आरोप रुथिया कुटुंबीयांनी केला आहे. 

नातू कर्जाची वसुली करणार

सेठ जुम्मा लाल रुथिया यांचे नातू विवेक रुथिया यांनी या प्रकरण समोर आणले आहे. विवेक रुथिया ब्रिटिश राजघराण्याला कर्जाची परतफेड करण्यासाठी कायदेशीर नोटीस बजावणार आहेत. ब्रिटिश सरकारला कर्ज देऊ केल्याचे जुने दस्तऐवज सापडल्याचे विवेक यांनी म्हटले आहे. “जुन्या नोंदींमध्ये काही प्रमाणपत्रं, पत्रव्यवहार, वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मृत्युपत्र यासह ब्रिटिशांना कर्ज दिल्याचे कागदोपत्री पुरावे सापडले आहेत”, असे विवेक रुथिया म्हणाले. ब्रिटिश सरकारने अद्याप ते कर्ज परत केले नसल्याचेही रुथिया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

रुथिया भोपाळमधील श्रीमंत कुटुंब

स्वातंत्र्यापूर्वी, रुथिया कुटुंब सिहोर आणि भोपाळ संस्थानांमधील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक होते. त्यांचा प्रशासशनात देखील विशेष प्रभाव होता. रुथिया यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमीन आणि मालमत्ता होती. आजही सिहोरमधील २० ते ३० टक्के वस्ती रुथिया कुटुंबाच्या मालकीच्या जमिनीवर असल्याचे सांगितले जाते. रुथिया कुटुंबाकडे अजूनही सिहोर, इंदूर आणि भोपाळमध्ये मालमत्ता आहेत.

कायदेशीर अडचणी काय आहेत?

कायदे तज्ज्ञांच्या मते या प्रक्रियेत कायदेशीर अडचणी येण्याची शक्यता आहे. ब्रिटिश राघराण्याला नोटीस पाठवता येऊ शकते. पण, कर्ज देताना किंवा त्याची परतफेड करण्यासाठी कोणत्या अटी ठेवण्यात आल्या होत्या. शिवाय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा कर्जाबाबत काय निर्णय घेण्यात आला होता. अशा गोष्टींचा विचार केला जाऊ शकतो, असे सांगितले जात आहे. दरम्यान, सध्या हा विषय सर्वत्र चांगलाच चर्चेत आहे.