मंडय़ा : कर्नाटकातील १ हजाराहून अधिक मंदिरांमध्ये ९ मेपासून सकाळी ५ वाजता हनुमान चालीसा किंवा ओंकार किंवा भक्तिगीते वाजवली जातील, असे श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रविवारी सांगितले. मशिदींवर लावलेल्या भोंग्यांविरुद्ध कारवाई करण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोपही त्यांनी केला.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर भोंग्यांविरुद्ध कारवाई केली आणि इतर ठिकाणच्या भोंग्यांचा आवाज कमी करायला लावला, त्याप्रमाणे ‘हिंमत दाखवण्याचे’ आवाहन मुतालिक यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई व गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र यांना केले. ‘कर्नाटकभरात आम्ही १ हजाराहून अधिक मंदिरांशी संपर्क केला आहे. उद्यापासून (सोमवार) सकाळी ५ वाजता हनुमान चालीसा किंवा ओंकार किंवा भक्तिगीते वाजवण्याचे मंदिराचे पुजारी, धर्माधीश आणि व्यवस्थापन समित्यांनी मान्य केले आहे. हा प्रतिसाद अतिशय चांगला आहे’, असे मुतालिक म्हणाले.