सध्या रशिया आणि युक्रेन या दोन देशांत युद्ध सुरू आहे. हे युद्ध सुरू होऊन आज १०९ दिवस उलटले आहेत, तरीही युद्ध थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. या युद्धात रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांना मोठा फटका बसला आहे. दररोज निष्पाप नागरिकांसह आणि अनेक सैनिक मारले जात आहेत. युद्ध सुरू झाल्यापासून प्रथमच युक्रेनच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यानं युद्धात मृत पावलेल्या सैनिकांबाबत मोठा खुलासा केला आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार ओलेक्सी अरेस्टोव्हिच यांनी शनिवारी सांगितलं की, युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत युक्रेनच्या १० हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी अलीकडेच सोशल मीडियावर एक मुलाखत दिली होती. मुलाखतीदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर त्यांनी १० सैनिकांचा मृत्यू झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. याशिवाय युद्धात दररोज १०० युक्रेनियन सैनिक मारले जात असल्याची माहिती युक्रेनचे संरक्षण मंत्री ओलेक्सी रेझनिकोव्ह यांनी अलीकडेच दिली होती.

हेही वाचा- विश्लेषण : अमेरिकेने युक्रेनला देऊ केलेली ‘हायमार्स’ यंत्रणा काय आहे?

दुसरीकडे, रशियानं मात्र युक्रेन युद्धादरम्यान झालेल्या जीवितहानीबाबत अद्याप कोणताही खुलासा केला नाही. रशियानं २५ मार्च २०२२ रोजी युक्रेनसोबतच्या युद्धात आमचे १३५१ सैनिक मारलेगेल्याचं कबूल केलं होतं. त्यानंतर त्यांनी जीवितहानीबाबत कोणतीही अधिकृत भाष्य केलं नाही. पण अमेरिका आणि इतर काही पाश्चात्य गुप्तचर संस्थांच्या मते आतापर्यंत रशियाने युद्धात आपले १० हजार सैनिक गमावले आहेत. तर १० जूनपर्यंत रशियाचे सुमारे ३१ हजार ९०० सैनिक मारल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात येत आहे.

हेही वाचा- विश्लेषण : युक्रेन युद्धाचे १०० दिवस…; कुणी काय गमावले, काय कमावले?

युद्धात मारल्या गेलेल्या सैनिकांबद्दल रशिया जाहीरपणे काहीही बोलत नसलं तरी, एप्रिल महिन्यात युक्रेनमध्ये बेपत्ता झालेल्या सैनिकांच्या नातेवाईकांकडून सुमारे ४२ हजार तक्रारी क्रेमलिनला (रशियन संसद) पाठवल्या आहेत. याबाबतच वृत्त iStories ने दिलं आहे. राष्ट्राध्यक्षांकडे तक्रार करणारे बहुतांशी लोक व्लादिमीर पुतीन यांचे निष्ठावंत असून ते राजकीय नाहीत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपर्यंत युक्रेनने जवळपास ६०० रशियन सैनिक युद्ध कैदी बनवले होते. यातील ४०० कैद्यांची देवाणघेवाण करण्यात आली आहे.