पीटीआय, लंडन : ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेमधील (एनएचएस) सुमारे १ लाख परिचारिका गुरूवारपासून संपावर गेल्या आहेत. हे इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे आंदोलन ठरले आहे. वेतनवाढीसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले असून संपकरी परिचारिकांमध्ये अनेक भारतीयही आहेत.
इंग्लंड, उत्तर आर्यलड आणि वेल्स या तीन्ही प्रांतांमधील परिचारिकांनी गुरूवारी कामबंद आंदोलन केले. या संपामुळे ब्रिटनची आरोग्य सेवा मोठय़ा प्रमाणात विस्कळित झाली. देशभरातील बाह्यरुग्ण विभाग आणि शस्त्रक्रीयांवर मोठा परिणाम झाला. तातडीच्या आणि जीवरक्षक सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या होत्या. या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी पुन्हा एकदा कामबंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. वाढत्या महागाईचा सामना करणे कठीण होत असल्यामुळे वेतनवाढीची मुख्य मागणी करत गेल्या महिन्यात या संपाची हाक देण्यात आली होती. ब्रिटनच्या ऋषी सुनक सरकारने चर्चा करून मार्ग काढावा, असा सल्ला काही अतिउजव्या माध्यमांनीही दिला होता. आठवडय़ाच्या सुरूवातीला संपाचे नेतृत्व करणाऱ्या रॉयल कॉलेज ऑफ नर्सिगच्या प्रतिनिधींची सरकारसोबत झालेली चर्चा निष्फळ झाली होती. विरोधी मजूर पक्षाने या संपावरून सत्ताधारी पक्षावर टीकेची झोड उठविली आहे.
भारतीयांची मोठी संख्या : ब्रिटनमध्ये परिचारिकांच्या कमतरतेमुळे अन्य देशांमधून कर्मचारी घेतले जातात. २०२१-२२च्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये ३७ हजार ८१५ भारतीय परिचारिका आहेत. भारताचा क्रमांक दुसरा असून फिलिपिन्सच्या सर्वाधिक ४१ हजार ९० परिचारिका ब्रिटनमध्ये काम करत आहेत.