आगरतळा : सत्ताधारी भाजपचे नऊ आणि मित्रपक्ष आयपीएफटीचे दोन अशा ११ आमदारांना सोमवारी त्रिपुरातील माणिक साहा यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ देण्यात आली.

मंत्रिमंडळात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या भाजप- आयपीएफटी आघाडी सरकारच्या मंत्र्यांना राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल एस.एन. आर्य यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.

कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आमदारांमध्ये भाजपचे जिष्णु देव वर्मा, रतन लाल नाथ, प्राणजित सिंघ रॉय, मनोज कांती देव, संताना चकमा, राम प्रसाद पॉल, भगवान दास, सुषांत चौधरी, राम पाद जमातिया आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुराचे (आयपीएफटी) एन.सी. देववर्मा व प्रेम कुमार रियांग यांचा समावेश आहे.

मुख्यमंत्री माणिक साहा, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव व प्रतिमा भौमिक आणि माजी मुख्यमंत्री बिप्लब कुमार देव हे शपथविधी समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते. मंत्र्यांच्या खात्यांची घोषणा नंतर केली जाणार असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. अकरा मंत्र्यांपैकी भाजपचे राम पाद जमातिया व आयपीएफटीचे प्रेम कुमार रियांग हे दोघेच बिप्लब कुमार देव यांच्या मंत्रिमंडळात नव्हते. आयपीएफटीचे मेवेर कुमार जमातिया यांना साहा यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे.