गीरच्या जंगलात मागील ११ दिवसांमध्ये ११ सिंहांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. गुजरातमधील गीरचे जंगल सिंहांसाठी प्रसिद्ध आहे. आता या ठिकाणी ११ सिंहांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. गीर जंगलातील पूर्व भागातल्या जंगलात ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. दलकहनियाजवळील परिसरात या ११ सिंहांचे मृतदेह मिळाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.

गीर येथील पूर्व भागात आम्हाला ११ सिंहांचे मृतदेह मिळाले अशी माहिती वन विभागाचे उप संरक्षक पी पुरुषोत्तम यांनी दिली. अमरेली जिल्ह्यातील राजुला भागात आम्हाला काही सिंहांचे मृतदेह बुधवारी मिळाले. तर त्यानंतर आणखी तीन सिंहांचे मृतदेह त्याच दिवशी दलकहनियाजवळ मिळाले. या सगळ्या मृतदेहांचा व्हिसेरा आम्ही जुनागड येथील वन्य प्राण्यांच्या रूग्णालयात पाठवला आहे. या संदर्भातला अहवाल आल्यावरच हे मृत्यू का झाले याची माहिती मिळू शकेल असेही पुरुषोत्तम यांनी म्हटले आहे.

याचसोबत ११ सिंहांच्या मृत्यू प्रकरणी आम्ही चौकशीचे आदेश दिले आहेत अशी माहिती वन आणि पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता यांनी दिली. मुख्य वन संरक्षांच्या अध्यक्षतेखाली ही नेमण्यात आलेली समिती यासंदर्भातली चौकशी करणार आहे. ११ पैकी ८ सिंहांचा मृत्यू हा आपसातील भांडणात एकमेकांवर केलेल्या हल्ल्यामुळे झाला असा असावा असा प्राथमिक अंदाज आहे. तर इतर तीन सिंहांचा मृत्यू कसा झाला याबाबत अहवाल आल्यावरच भाष्य करता येईल असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले. २०१५ च्या प्राणी गणनेनुसार गीरमध्ये ५२० सिंह आहेत. आता या ११ सिंहांचा मृत्यू गेल्या ११ दिवसांमध्ये कसा झाला त्यामागे नेमके काय कारण होते? हे व्हिसेरा अहवाल आल्यावरच स्पष्ट होऊ शकणार आहे.