नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचारी आणि निवृतीधारकांच्या महागाई भत्त्यामध्ये ११ टक्के इतकी भरघोस वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. महागाईभत्ता १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला असून, ही वाढ १ जुलै २०२१ पासून लागू होईल, अशी माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या निर्णयामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. करोना संकटामुळे गेल्या वर्षी केंद्र सरकारने महागाई भत्त्याला स्थगिती दिली होती. आता याच महिन्यापासून महागाईभत्ता देण्यात येणार असून, केंद्र सरकारच्या तिजोरीवर सुमारे ३४ हजार ४०० कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल. ४८.३४ लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५.२६ लाख निवृत्तीधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे.

तीन हप्ते १७ टक्क्यांनी

गेल्या वर्षी केंद्र सरकारने महागाईभत्यात ४ टक्के वाढ करून तो २१ टक्के केला होता. हा वाढीव भत्ता जानेवारी २०२१ पासून लागू होणे अपेक्षित होते. मात्र, एप्रिल २०२० पासून महागाईभत्ता गोठवण्यात आला होता. आता महागाईभत्ता दिला जाणार असला तरी, जानेवारीपासूनची थकबाकी २१ टक्क्यांनुसार दिली जाणार नाही. १ जानेवारी व १ जुलै २०२० आणि १ जानेवारी २०२१ हे महागाईभत्ता थकबाकीचे तीन हप्ते १७ टक्क्यांनुसार दिले जातील.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 percent increase in dearness allowance for central employees zws
First published on: 15-07-2021 at 00:07 IST