नक्षलवाद्यांच्या सांस्कृतिक आघाडीतील ११ जणांना नक्षलवादी विचारसरणीचा प्रचार केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असून त्यामध्ये प्रामुख्याने महिलांचा समावेश आहे. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांच्या वतीने पीएलजीए सप्ताह पाळण्यात येत असून त्यादरम्यान ही अटक करण्यात आली.
स्थानिक पोलिसांचे पथक भैरमगड येथे एका नदीजवळ आले असता त्यांना काही आदिवासी युवक सरकारविरोधी घोषणा देत असल्याचे आढळले. गावकऱ्यांना सरकारविरोधात चिथावणी देण्याचा हा प्रकार असल्याचे निदर्शनास आले, असे पोलिसांनी सांगितले.
या प्रकारानंतर सदर आदिवासींची चौकशी करून त्यांच्याविरुद्ध छत्तीसगड विशेष सार्वजनिक सुरक्षा कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले आदिवासी २० ते २३ वयोगटातील असून ते नक्षलवाद्यांच्या चेतना नाटय़ मंडळीचे सदस्य आहेत.